- दिनेश पाठक
नाशिक :नाशिककरांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभाग (आत्मा), मनपा तसेच जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्रातला सेंद्रिय भाजीपाला व्यवसायातील पहिला पायलट प्रोजेक्ट शहरात राबविण्यात येणार असून, १० विक्री केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विषमुक्त भाजीपाला मिळणार आहे.
प्राथमिक पातळीवर त्यातील पहिले केंद्र उंटवाडी येथील कृषी विभागाच्या 'रामेती' आवारात सुरू करण्यात आले आहे. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता, आणखी नऊ केंद्र शहरातील विविध भागांत सुरू केली जातील.
या केंद्रांमध्ये ग्रामीण भागातील महिला बचतगट, आदिवासी शेतकरी महिला, वैयक्तिक शेतकरी शहरात येऊन उत्पन्नाचा स्रोत निर्माण करतील. शेतकरी ते ग्राहक ही एकच साखळी राहणार असल्याने ग्राहकांनाही वाजवी दरात विषमुक्त भाजीपाला मिळेल. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ९ केंद्रांसाठी जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत.
बाजारात काय मिळणार?
पिकवलेला विषमुक्त शेतमाल, शेती उत्पादने यामध्ये विविध पालेभाज्या, रानभाज्या, फळभाज्या, फळे, पौष्टिक तृणधान्ये, सेंद्रिय डाळी, तांदूळ, कडधान्य आणि त्यापासून तयार झालेले विविध खाद्यप्रदार्थ विक्रीसाठी असतील.
येथे जागांची पाहणी
मनपाच्या खुल्या जागेत विषमुक्त भाजीपाला केंद्र सुरू करण्यासाठी चाचपणी करण्यात येत असून, नाशिक रोड, गंगापूर रोड, इंदिरानगर, पंचवटी येथील जागा निश्चिती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली. 'रामेती' कार्यालय आवारात दर शनिवारी सेंद्रिय भाजीपाला बाजार विविध स्टॉलच्या माध्यमातून भरवला जात आहे.
फवारणी न करता काढलेले उत्पादन तसेच सेंद्रिय निविष्ठा वापरून पिकवलेला भाजीपाला, तृणधान्य आदी प्रकार शहरातील दहा केंद्रांमध्ये मिळेल. एक केंद्र सुरू केले आहे. बाकीच्या भाजीपाला केंद्रांसाठी जागांचा शोध सुरू आहे. या प्रोजेक्टसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षकांचे मार्गदर्शन मिळत आहे. येथे ग्राहकाला ताजे व आरोग्यदायी अन्न मिळेल. उंटवाडीतील केंद्रात नागरिकांनी दर शनिवारी अवश्य भेट द्यावी.
- अभिमन्यू काशिद, प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)
आम्ही गेल्या महिन्यापासून उंटवाडी येथील शासकीय विक्री केंद्रात विषमुक्त भाजीपाला आणतोय. विक्रीसाठी आणलेला माल विषमुक्त आहे का? याची खात्रीदेखील संबंधित यंत्रणेमार्फत केली जाते. विक्री केंद्रात चांगला प्रतिसाद मिळत असून, सुटा माल तसेच पॅकिंग सेवाही ग्राहकांना देत आहोत
- अर्जुन मोहन, निफाड