Join us

PM Kisan Nidhi : पीएम किसानचा 17 वा हफ्ता वितरणासाठी मंजुरी, कधी मिळणार हफ्ता? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 14:23 IST

PM Kisan Status : पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याचे वितरण करण्यास अधिकृतरित्या परवानगी मिळाली आहे.

PM Kisan Nidhi : देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शपथ घेतली. यानंतर त्यांनी पहिल्यांदा पीएम किसान PM Kisan Scheme) योजनेच्या 17 व्या हप्त्याचे वितरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच आता देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या, त्यामुळे 17 वा हफ्ता (PM Kisan 17th Instalment) मिळणार की नाही? याबाबत सांशकता होती, मात्र आज पंतप्रधानांनी पहिलीच स्वाक्षरी करून शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याचे वितरण करण्यास अधिकृतरित्या परवानगी मिळाली आहे. त्यानुसार 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या फ्लॅगशिप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठीच्या हप्त्याशी संबंधित फाइलवर त्यांनी स्वाक्षरी केली. यामुळे देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे वितरण होईल.

कधी मिळणार हफ्ता ?

दरम्यान पी.एम.किसान योजनेचा १७ वा हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा १७ वा हप्ता वितरणापूर्वी स्वत: करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. 

9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ 

मोदी यांनी या योजनेच्या 17 व्या हफ्त्याला मंजुरी दिल्यामुळे साधारण 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2000 रुपये येणार आहेत. केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना एकूण 20 हजार कोटी रुपये दिले जातील. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात या योजनेची सुरुवात केली होती. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा 16 वा हफ्ता आला होता.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनानरेंद्र मोदीशेतीशेतकरीशेती क्षेत्र