Pm Kisan Hafta : देशातील लाखो शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या २० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हप्ते आले आहेत. परंतु २० वा हप्ता कधी येईल, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. हप्ता जारी होण्यापूर्वी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर तारीख जाहीर केली जाते. परंतु अद्याप कोणतीही तारीख जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसानचा हफ्त्याबाबत विचारणा केली जात आहे. यापूर्वी अनेक तारखांचा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र एकही तारीख निश्चित ठरू शकलेली नाही. आता पुन्हा एक नवीन तारीख समोर आली आहे. यामध्ये पीएम नरेंद्र मोदी हे २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान किसानचा २० वा हप्ता जारी करू शकतात.
दरम्यान २ ऑगस्ट या तारखेचे अनुमान यासाठी लावण्यात येत आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून वाराणसीमध्ये एक मोठा कार्यक्रम घेणार आहेत. या दिवशी पंतप्रधान उत्तर प्रदेशसाठी अनेक मोठ्या घोषणा करू शकतात. याच वाराणसी दौऱ्यात पीएम किसानचा २० वा हप्ता जारी करू शकतात, असे सांगितले जात आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
पीएम किसानची अधिकृत वेबसाईट पाहावी लागेल पीएम किसानच्या २० व्या हप्त्याच्या तारखेसाठी शेतकऱ्यांना सरकारच्या घोषणेची वाट पहावी लागेल. यासाठी सरकार पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाइट किंवा एक्स हँडलद्वारे तारखेची माहिती देते. सरकार वर्षातून तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा करते, ज्यामधून शेतकरी खते, बियाणे किंवा इतर शेतीच्या कामांसाठी मदत घेतात. पीएम किसानची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.