Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > गावाने उभं केलं 'ऑक्सिजन पार्क', स्मशानभूमीच्या ७ एकर ओसाड जागेवर फुलवली आंबा, शेवग्याची बाग

गावाने उभं केलं 'ऑक्सिजन पार्क', स्मशानभूमीच्या ७ एकर ओसाड जागेवर फुलवली आंबा, शेवग्याची बाग

latest News planted mango and sheva gardens on 7 acres of barren land of the cemetery | गावाने उभं केलं 'ऑक्सिजन पार्क', स्मशानभूमीच्या ७ एकर ओसाड जागेवर फुलवली आंबा, शेवग्याची बाग

गावाने उभं केलं 'ऑक्सिजन पार्क', स्मशानभूमीच्या ७ एकर ओसाड जागेवर फुलवली आंबा, शेवग्याची बाग

Agriculture News : लोकसहभागाची जोड मिळाल्यास गाव कसे 'समृद्ध' होऊ शकते, हे देऊळगाव ग्रामपंचायतीने ओळखले. 

Agriculture News : लोकसहभागाची जोड मिळाल्यास गाव कसे 'समृद्ध' होऊ शकते, हे देऊळगाव ग्रामपंचायतीने ओळखले. 

- पुंजीराम मेश्राम
ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात, मात्र लोकसहभागाची जोड मिळाल्यास गाव कसे 'समृद्ध' होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण आरमोरी तालुक्यातील देऊळगाव ग्रामपंचायतीने घालून दिले आहे. 

'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना'तून ग्रामपंचायतीने चक्क स्मशानभूमीच्या ७ एकर ओसाड जागेवर आंबा, शेवगा आणि मोहगनीच्या १ हजार ७०० हून अधिक झाडांची लागवड करून नवा आदर्श निर्माण केला आहे.

देऊळगाव ग्रामपंचायतीने आपल्या मालकीच्या सात एकर विस्तीर्ण जागेवर ही लागवड केली आहे. यामध्ये ७०० आंब्याची रोपटी, १००० शेवग्याची झाडे आणि २५ मोहगनीच्या रोपट्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही सर्व लागवड ९ बाय ९ अशा शास्त्रीय अंतरावर करण्यात आली आहे. 

झाडांच्या संगोपनासाठी ठिबक सिंचनाची (ड्रिप) सोय करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे देऊळगावची स्मशानभूमी आता केवळ अंतिम संस्काराची जागा न राहता, एक निसर्गरम्य 'ऑक्सिजन पार्क' आणि समृद्धीचे केंद्र म्हणून ओळखली जाणार आहे.

ग्रामपंचायतचा उत्पादनाचा '३०:७०' फॉर्म्युला !
या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भविष्यात या झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे वाटप. जेव्हा या फळझाडांपासून उत्पादन सुरू होईल, तेव्हा त्यातील ३० टक्के वाटा गावकऱ्यांना दिला जाईल, तर उर्वरित ७० टक्के वाटा ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा होईल. यामुळे गावाच्या उत्पन्नात भर पडण्यासोबतच गावकऱ्यांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

खर्च आणि नियोजनाचा 'देऊळगाव पॅटर्न'
या मोहिमेसाठी झाडांच्या खरेदीवर १ लाख २५ हजार रुपये आणि ठिबक सिंचन व्यवस्थेवर १ लाख ५२ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा खर्च लोकवर्गणी, ग्रामस्थांचा प्रत्यक्ष श्रमदान रुपी सहभाग आणि ग्रामपंचायत निधीतून करण्यात आला आहे. स्मशानभूमी परिसरात आधीच बोअरवेलचे खोदकाम करण्यात आले होते,

त्याचा उपयोग आता या वनराईला पाणी देण्यासाठी केला जात आहे. सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी १ मे रोजी देऊळगावला भेट देऊन बागेची पाहणी करीत सरपंच व ग्रामपंचायतीच्या कामाची प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर पाहणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.

गावाच्या विकासात गावकऱ्यांचा सहभाग वाढवणे आणि पडीक जमिनीचा उत्पादनासाठी वापर करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून आम्ही ही फळबाग उभी केली असून, भविष्यात यातून गावाला मोठा आर्थिक आधार मिळेल. गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास आणि लोकसहभाग या उपक्रमाचा कणा आहे.
  - श्यामादेवी सहारे, सरपंच, ग्रामपंचायत देऊळगाव
 

Web Title : गाँव ने श्मशान भूमि को फलदार वृक्षों से 'ऑक्सीजन पार्क' बनाया

Web Summary : देऊलगाँव गाँव ने 7 एकड़ बंजर भूमि को आम, सहजन और महोगनी के पेड़ लगाकर 'ऑक्सीजन पार्क' में बदल दिया। ग्रामीणों को भविष्य में मुनाफे का 30% मिलेगा, जिससे स्थानीय अर्थव्यवस्था को बढ़ावा मिलेगा और रोजगार मिलेगा। यह पहल सामुदायिक भागीदारी और सतत भूमि उपयोग को दर्शाती है।

Web Title : Village Transforms Crematorium into 'Oxygen Park' with Fruit Trees

Web Summary : Deulgaon village converted 7 acres of barren land into an 'Oxygen Park' by planting mango, drumstick, and mahogany trees. Villagers will receive 30% of the future profits, boosting the local economy and providing employment. This initiative showcases community involvement and sustainable land use.