Fruit Crop Insurance : अखेर फळ पीक विमा योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता संबंधित पिकांच्या पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना ६ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहेत. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, जास्त आर्द्रता या सारख्या हवामान घटक यांचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसान परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. या अनुषंगाने यंदाच्या मृग बहार साठी फळ पीक विम्याचे अर्ज मागविण्यात येत आहे.
रस्ताही हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये मृग बहार २०२५ मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक ३० जून २०२५ होती. मात्र २७ जून २०२५ पासून आधार संकेत स्थळ बाबत समस्या असल्याने विमा अर्ज करण्यामध्ये अडचणी येत होत्या.
त्याचा विचार करून केंद्र शासनाने दिनांक ०३ जुलै २०२५ ते दिनांक ०६ जुलै २०२५ असे ४ दिवस वरील पिकांसाठी फळ पिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या www.pmfby.gov.in विमा योजना या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेत भाग घेण्यासाठी आवश्यक बाबी पुढीलप्रमाणे आहे.
- Agri stack नोंदणी क्रमांक , आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन धारणा उतारा, Geo tag फोटो, ई – पिक पहाणी बंधनकारक आहे.
- ई पीक पाहणी नोंद नसल्यास पिक विमा अर्ज रद्द होऊ शकतो.
- ई पीक नोंदणी पिक विम्यात भाग घेतल्यानंतर जुलै – ऑगस्ट महिन्यात करू शकतात.
- जास्त माहिती घेण्यासाठी नजिकच्या विमा कंपनी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे .