नाशिक : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२५ (Kharif Season) वर्षाकरिता एक रुपयात पीक बंद केल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसल्याने शासनाने १४ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ दिल्याने प्रधानमंत्री पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.
३१ जुलैपर्यंत साडेतीन लाखांवर थांबलेली विमाधारकांची (Pik Vima Yojana) संख्या वाढून १४ ऑगस्टपर्यंत कर्जदार आणि बिगर कर्जदार मिळून चार लाख ५८ हजार १४१ पोहोचली असून, मागील वर्षीच्या तुलनेत प्रधानमंत्री पीक विमाधारक शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
खरीप हंगामात भात, ज्वारी, कापूस, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, मका, कांदा, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे या खरीप पिकांसाठी पीक विमा संरक्षण प्राप्त झाल्याने १४ ऑगस्टपर्यंत नाशिक जिल्ह्यात चार लाख ५८ हजार १४१ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विम्याचे कवच घेतले, तर मालेगाव तालुक्यात सर्वात जास्त ८५ हजार ९५१, तर नाशिक तालुक्यात सर्वात कमी ४४५६ शेतकऱ्यांनी विम्याचे संरक्षण घेतले.
तर, मालेगाव तालुक्याखालोखाल येवला तालुक्यात ६२ हजार ८०९ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा उतरविला आहे. कृषी विभागाकडून जनजागृती कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून गावोगावी जाऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती देऊन प्रचार प्रसिद्धी व जनजागृती मोहीम राबविण्यात आल्या होत्या.
एक रुपयात पीक विमा
नाशिक जिल्ह्यात एकूण कर्जदार आणि बिगर कर्जदार ४ लाख ५८ हजार १४१ शेतकरी आहेत. तर विमा संरक्षित क्षेत्र २,९५,३६६.१६ हेक्टर आहे. मागील वर्षी एक रुपयात पीक विमा असल्याने ५ लाख ९१ हजार ३७४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. यावर्षी मात्र शेतकऱ्यांना घरातून पैसे भरावे लागल्याने ४ लाख ५८ हजार १४१ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे.