- संदीप भालेराव
नाशिक : नाशिक जिल्ह्यात पीकविमा योजनेत (Pik Vima Yojana) झालेल्या गैरप्रकारात अनेक नवनवीन बाबी समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील ७३ शेतकऱ्यांनी एकाच क्षेत्रावर दोन किंवा अधिक वेळा पीकविमा (Pik Vima Ghotala) उतरवला असून, चार ४,२६५ शेतकऱ्यांनी लागवड क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र विमा संरक्षित करण्याचा प्रकार केला आहे. यामध्ये चांदवड, बागलाण आणि नांदगाव तालुक्यात अधिक गैरप्रकार झाल्याचे दिसून येते.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सिन्नर, चांदवड, येवला, निफाड, देवळा, बागलाण, दिंडोरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक आणि त्र्यंबक या तालुक्यांमध्ये पीक विमा योजनेत गैरप्रकार झाल्याचे पडताळणीत समोर आले. चांदवडमधील ४, बागलाण मधील ४, तर नांदगाव तालुक्यात ६५ शेतकऱ्यांनी एकाच क्षेत्रावर अनेकदा पीकविमा उतरविण्याचा प्रयत्न केला. यामुळे सरकारला मोठी आर्थिक रक्कम भरावी लागली असती; परंतु वेळीच पडताळणीत याबाबी समोर आल्याने सरकारचे आर्थिक बचत झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४ प्रधानमंत्री पीकविमा योजनेत कांदा पीक अंतर्गत ८१,६२३ शेतकऱ्यांनी सहभाग घेत ४६ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रावर कांदा पीकविमा उतरवला आहे, तर फळ पीकविमा योजनेत १९७८ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेऊन १४६१.५० हेक्टर क्षेत्रावर फळ पीकविमा उतरवला आहे.
४,२६५ शेतकऱ्यांनी सुमारे १,५०२ हेक्टर अधिकच्या क्षेत्रावर पीकविमा घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्वाधिक शेतकरी नांदगाव तालुक्यातील असून, त्या खालोखाल निफाड आणि कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. हा सर्व प्रकार १२ २ तालुक्यांत थोड्याफार प्रमाणात आढळून आला. गैरप्रकारचा हा सिलसिला एवढ्यावरच थांबला नाही तर जवळपास २३ शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर पीकविमा नोंद केला.
फळपीक :
- १,९७८ : विमा सहभाग अर्जदार
- १,४६१: विमा हेक्टर क्षेत्र
- योग्य आढळून आलेले अर्ज व हेक्टर
- १,७४२ : विमा अर्ज
- १,३६२: विमा हेक्टर क्षेत्र
कांदापीक :
- ८१,६२३ : विमा सहभाग अर्जदार
- ४६,६८७ : विमा हेक्टर क्षेत्र
- योग्य आढळून आलेले अर्ज व हेक्टर
- ८०,७१६ : विमा अर्ज
- ४३,०१६ : विमा हेक्टर क्षेत्र
Pik Vima Yojana : नुसता कांद्यांचाच नाही तर फळपीकविम्यातही गोंधळ, जाणून घ्या सविस्तर