नाशिक : ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. १९ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल ४८ हजार ३२४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पंचनामे आणि यादीत नाव येण्यासाठी नुकसानीची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.
पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत स्थळ पाहणी करुन संयुक्त स्वाक्षरीचे पंचनामे करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी / कर्मचारी यांची नेमणुक करण्यात येत आहे. तरी सदर अधिकारी व कर्मचारी यांनी या आदेशानुसार तात्काळ कार्यवाही करुन संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे सांगण्यात आले आहे.
पंचनामे करतांना काही सुचना देण्यात आल्यात...
- या हंगामासाठी पिक नुकसान यापुर्वी झालेल्या क्षेत्राची व गट नंबरची पुनरावृत्ती होणार नाही.
- तसेच दुबार अनुदान या हंगामासाठी वाटप होणार नाही, याची संबधित पालक अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
- पंचनामा करतांना बाधित शेतकरी व पालक अधिकारी यांचा संयुक्त जीपीएस सह फोटो घेण्यात यावा.
- 33 टक्क्यांपेक्षा जास्त पिक नुकसान असेल तरच पंचनामे करुन यादीत नाव सामाविष्ट करावे.
- पंचनामे व सॉफ्ट कॉपी याद्या सादर करतांना क्षेत्र, व शेतकरी संख्येचा ताळमेळ घेवुनच बिनचुक सादर कराव्यात.
- यात वारंवार स्वतंत्र सुचनांची वाट पाहू नये, तसेच सदर बाबत तगादा करण्याची वेळ येवू देऊ नये.
शेती पिंकाचे पंचनामे करतांना, संबंधित गावाचे पालक अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील नेमून दिलेल्या गांवामधील क्षेत्राची पाहणी करुन, उभ्या असलेल्या पिंकाचे नुकसानीचे पंचनामे करुन, त्याबाबत शेतकऱ्यांचा जबाब घ्यावा. तसेच पंचनामा करतांना जिओ टॅगिंग करावे.
नुकसान झालेल्या शेतजमिनीचे / पिकांचे GPS / ENABLE फोटो मोबाईल अॅपच्या सहाय्याने काढणे तसेच नुकसान ग्रस्त शेतकरी यांची यादी गट क्रमांक, नुकसान क्षेत्र, बँक खाते माहिती, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, agristack क्रमांक या सर्व माहितीसह तयार करावी.
प्रत्यक्ष शेतजमिनीचे / पिकांची पाहणी केल्यांनतर, नुकसांनीची टक्केवारी ठरविणे व नुकसान ग्रस्त शेतकऱ्याने पीक विमा घेतला असल्यास ते पंचनाम्यावर स्पष्ट नमुद करावे. तसेच पालक अधिकारी यांनी नेमुन दिलेल्या गावांचे पंचनामे व विहित नमुन्यात अ, ब, क, ड तक्ता तयार करुन, त्यावर सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी संयुक्त स्वाक्षरीनिशी आहवाल हा आदेश निर्गमित झालेपासून सात दिवसांचे आत तहसिल कार्यालयास सादर करावा, असेही नमूद करण्यात आले आहे.
