बीड : राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप सुरू असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यात मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलन सुरू आहे. ऊसाला प्रति टन ४ हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली असून गेल्या सात दिवसांपासून आंदोलकांनी नो केन आंदोलन करून कारखाने बंद पाडले आहेत.
बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊसाला ९.५ च्या उताऱ्यासह फक्त २४४३ रुपये प्रति टन दर देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला असून त्याचाच परिणाम म्हणून गेल्या सहा दिवसांपासून अपेक्षित भाव मिळावा, यासाठी आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान सायखेडा येथील अमित देशमुख यांच्या कारखान्यासमोर सुरू असलेल्या आंदोलनावर येथील प्रशासनाने बाऊन्सर सोडल्याचे देखील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
बीड आणि परभणी जिल्ह्यामध्ये ऊसाला किमान ४ हजार रुपये भाव मिळावा. पहिली उचल ३ हजार रुपये मिळावी, या मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन सुरू आहे. सुरवातीला रास्ता रोको आंदोलनानंतर माजलगाव व आजूबाजूच्या परिसरामध्ये कोयता बंदी आंदोलन सुरू करण्यात आले. गेल्या तीन चार दिवसापासून या भागातील ऊसतोड व ऊस वाहतूक आंदोलकांनी बंद केली आहे. बीड नंतर आता हे आंदोलन शेजारच्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा फोफावत आहे.
प्रशासनाशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पोलिसांनी दडपशाही सुरू केली आहे. किसान सभेच्या काही कार्यकर्त्यांना अटका करण्यात आल्या आहेत. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येत आहे. स्थानिक आमदार भडकाऊ वक्तव्य करत असून यामुळे परिस्थिती बिघडत आहे. राज्य सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ,असे आवाहन किसान सभेच्या वतीने करत आहोत.
- डॉ अजित नवले, राज्यसचिव, अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र
