Palash tree benefits : वसंत ऋतूची चाहूल लागताच जिल्ह्यातील रानोमाळ, दऱ्या-खोऱ्यात आणि रस्त्यांच्या दुतर्फा लाल-केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेला पळस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Palash tree benefits)
‘पळसाला पाने तीन’ ही म्हण सर्वश्रुत असली, तरी या वृक्षाचे औषधी गुणधर्म मात्र असंख्य आहेत. आयुर्वेदात पळसाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून त्याच्या पानांपासून ते फुलांपर्यंत प्रत्येक घटक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो.
'ब्रह्मवृक्ष' म्हणून ओळख
भारतीय संस्कृतीत पळसाला 'ब्रह्मवृक्ष' मानले जाते. त्याच्या तीन पानांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक समजले जाते.
धार्मिक विधींमध्ये, यज्ञ-हवनासाठी पळसाच्या समिधांचा वापर केला जातो. तसेच उपनयन संस्कारातही पळसाचा दंड दिला जातो.
पानांपासून द्रोण- पत्रावळी
पळसाच्या पानांपासून पारंपरिक द्रोण व पत्रावळी तयार केल्या जातात. आमटी, कढी, बासुंदी यांसारख्या पातळ पदार्थांसाठी द्रोणाचा वापर होतो, तर पत्रावळी ताट म्हणून वापरल्या जातात. पर्यावरणपूरक जीवनशैलीत याचे विशेष महत्त्व आहे.
पळसाचे औषधी गुणधर्म
आयुर्वेदानुसार पळस हा बहुगुणी औषधी वृक्ष आहे
जंतनाशक गुणधर्म : पानं आणि बिया पोटातील जंत नष्ट करण्यास प्रभावी
पचन सुधारक : पळसाचा अर्क पचनशक्ती वाढवतो व बद्धकोष्ठता दूर करतो
दाहशामक : सूज व वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त
त्वचारोगांवर उपयोग : फुले व साल अँटी-ऑक्सिडंट व प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध
कफ नियंत्रण : कफ पातळ करून बाहेर टाकण्यास मदत, श्वसनमार्ग स्वच्छ ठेवतो
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास सहाय्य
पक्ष्यांसाठी 'नैसर्गिक ज्यूसबार'
पळसाच्या फुलांमध्ये मुबलक मध असल्याने वसंत ऋतूत विविध पक्षी पोपट, बुलबुल, सनबर्ड, मैना या झाडांवर गर्दी करतात.
त्यामुळे पळसाला 'पक्षी उपयोगी वृक्ष' असेही म्हटले जाते. मधमाश्या व खारींसाठीही हा झाड उपयुक्त ठरतो.
मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर
पळसाच्या फुलांचा सुगंध सौम्य व आल्हाददायक असतो. हा सुगंध मेंदूतील 'हॅप्पी हार्मोन्स' सक्रिय करून मानसिक तणाव कमी करतो. अत्तर किंवा तेल स्वरूपात वापरल्यास थकवा दूर होतो आणि शांत झोप येण्यास मदत होते.
शहरीकरणाचा वाढता धोका
वाढत्या शहरीकरणामुळे पळसाच्या झाडांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
जंगलतोड व बांधकामांमुळे झाडांची संख्या घटतेय
रस्ते विस्तारामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे
प्रदूषणामुळे झाडांच्या वाढीवर परिणाम
यामुळे पळसासारख्या औषधी व पर्यावरणपूरक वृक्षांचे संवर्धन आवश्यक झाले आहे.
आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला
पळसाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
पळस जरी साधा दिसत असला, तरी तो बहुगुणी आहे. त्याचे संवर्धन आणि लागवड करणे ही काळाची गरज आहे, असे मत आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. वरद शिवप्रसाद चरखा यांनी व्यक्त केले.
पळस हा केवळ सुंदर फुलांचा वृक्ष नसून आरोग्य, पर्यावरण आणि संस्कृती यांचा संगम आहे. 'पाने तीन पण गुणधर्म हजार' हे या वृक्षाबाबत अक्षरशः खरे ठरते. त्यामुळे पळसाचे संवर्धन व जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
हे ही वाचा सविस्तर : Chighor Vegetable : 'चिघोर'ची भाजी खाल्लंय का? ही रानभाजी सध्या सुपरहिट!
अधिक वाचा :Wheat Management : गव्हाचे काड जाळताय? थांबा! 'हा' उपाय न केल्यास जमिन होईल उजाड
