Organic Farming : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार २०२५' अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील प्रगतशील शेतकरी कृषी भूषण भगवान रामजी इंगोले यांना जाहीर करण्यात आला आहे. (Organic Farming)
शेती विकासासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत दिलेले मार्गदर्शन याची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार ११ डिसेंबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात आला. (Organic Farming)
या वेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी, तसेच कृषी, पशुपालन व दुग्ध व्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या हस्ते कृषी भूषण भगवान इंगोले यांना शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. (Organic Farming)
कृषी भूषण भगवान इंगोले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी केवळ स्वतःच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून यशस्वी शेती केली नाही, तर राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांना मास्टर ट्रेनर म्हणून शेतीविषयक मार्गदर्शन केले आहे. (Organic Farming)
पीक व्यवस्थापन, मृद आरोग्य, कीड-रोग नियंत्रण, तसेच खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याच्या तंत्रांबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. (Organic Farming)
विशेष म्हणजे, कृषी भूषण भगवान इंगोले हे विषमुक्त शेतीचे पुरस्कर्ते असून मागील अनेक दिवसांपासून ते आपल्या शेतात रासायनिक कीटकनाशकांऐवजी सेंद्रिय व जैविक उपायांचा वापर करून शेती करत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होण्यासह जमिनीची सुपीकता आणि पिकांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत होत आहे. (Organic Farming)
शेतकऱ्यांना शेतीविषयक केलेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची, प्रशिक्षणाची आणि प्रत्यक्ष कृतीची दखल घेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांची 'शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार २०२५' साठी निवड केली आहे.
या सन्मानामुळे मालेगावसह संपूर्ण अर्धापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून कृषी भूषण भगवान इंगोले यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
