Organic Farming : रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आणि त्यांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता घटत असल्याने शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहेत.(Organic Farming)
हस्तपोखरी परिसरात सध्या शेणखत आणि लेंडीखताच्या खरेदीसाठी मोठी लगबग सुरू असून, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेणखताला प्राधान्य दिले आहे.(Organic Farming)
रासायनिक खतांना पर्याय म्हणून शेणखत
गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांचा अतिवापर झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. परिणामी उत्पादनात घट होण्याची समस्या निर्माण झाली आहे.
ही बाब लक्षात घेऊन अनेक शेतकरी आता शेणखताचा वापर वाढवत आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, शेणखतामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि त्याचा परिणाम तीन वर्षांपर्यंत टिकतो.
शेणखताच्या मागणीत मोठी वाढ
हस्तपोखरीसह आसपासच्या भागात यंदा शेणखत आणि लेंडीखताला मोठी मागणी आहे. मागणी वाढल्याने त्याच्या किमतीतही वाढ झाली आहे.
शेणखत (एक ट्रॉली): सुमारे ₹३,५००
लेंडीखत (एक ट्रॉली): सुमारे ₹४,०००
वाहतूक व मजुरीसह खर्च: ₹४,५०० ते ₹५,००० प्रति ट्रॉली
१० ट्रॉली शेणखतासाठी शेतकऱ्यांना सुमारे ५० हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे.
पशुपालकांना अतिरिक्त उत्पन्न
शेणखताच्या वाढत्या मागणीमुळे पशुपालक शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे. स्थानिक विक्रेते ईश्वर सोलाट यांनी सांगितले की, यंदा खत विक्रीत वाढ झाली असून त्यांनी आतापर्यंत सुमारे ५० हजार रुपयांचे शेणखत विक्री केले आहे.
रब्बीनंतर तयारीला वेग
रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी आणि गव्हाची काढणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी पुढील हंगामासाठी शेताची तयारी करत आहेत.
हस्तपोखरी परिसरात पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने मोसंबी, पेरू, डाळिंब आणि ऊस यांसारख्या नगदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकांसाठी शेणखताचा वापर अधिक फायदेशीर ठरत असल्याचे शेतकरी सांगतात.
उत्पादन वाढीचा अनुभव
माझ्याकडे पेरूची सात हजार झाडांची बाग आहे. मागील वर्षी शेणखताचा वापर केल्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आणि फळांना चांगला बाजारभाव मिळाला. त्यामुळे यंदाही मी १० ट्रॉली शेणखत घेतले आहे. -वर्षा वाघ, शेतकरी
रासायनिक खतांच्या वाढत्या खर्चामुळे आणि जमिनीच्या आरोग्यावरील परिणामामुळे शेतकरी सेंद्रिय पर्यायांकडे वळत आहेत. शेणखताच्या वाढत्या वापरामुळे उत्पादनात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळत असल्याचे चित्र आहे.
