सुमीत हरकुट
विदर्भाची ओळख असलेली नागपुरी संत्री आज संकटात सापडली असून, चांदूरबाजार तालुक्यात यंदाही मोठ्या प्रमाणात संत्राबागा कापण्याचे सत्र सुरू आहे. (Orange Orchard Crisis)
एकेकाळी 'सुवर्ण संत्रा पट्टा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात आता गावोगावी उभ्या संत्र्याच्या झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. वाढता उत्पादन खर्च, बाजारातील अत्यल्प दर आणि सातत्याने होणारे नैसर्गिक संकट यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत.(Orange Orchard Crisis)
संत्रा लागवडीसाठी लागणारे खत, औषधे, मजुरी, वीज व सिंचनाचा खर्च प्रचंड वाढला आहे. त्यातच अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ आणि रोगराई यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला.
एवढे कष्ट करूनही बाजारात संत्र्याला चार ते पाच रुपये किलो इतकाही दर मिळत नसल्याने शेतकरी तोट्यातूनच उत्पादन काढत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
कर्जाचा वाढता डोंगर
संत्राबागांची देखभाल करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बँका, सहकारी संस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले. मात्र, अपेक्षित उत्पादन व बाजारभाव न मिळाल्याने कर्जाचा डोंगर वाढतच गेला. उत्पन्न नसताना हप्ते भरणे अशक्य झाल्याने अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
संत्रा संशोधन केंद्राची मागणी
जिल्ह्यात संत्रा संशोधन केंद्र सुरू करावे, संत्रा उत्पादकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, हमीभाव द्यावा तसेच निर्यात प्रोत्साहन व रोग नियंत्रणासाठी प्रभावी मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी शेतकरी व कृषी विभागाकडून सातत्याने केली जात आहे. मात्र शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
झाडेच ओझे वाटू लागली
पूर्ण वाढलेल्या संत्राबागेचा वर्षभराचा खर्च मोठा असतो. मात्र विक्रीतून मिळणारे उत्पन्न नगण्य असल्याने ही झाडेच शेतकऱ्यांना ओझे वाटू लागली आहेत. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी अत्यंत कठोर निर्णय घेत संत्र्याची झाडे कापण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील अनेक गावांत दररोज शेकडो झाडे तोडली जात असून बागांच्या जागी आता ओसाड माळराने दिसू लागली आहेत.
काही शेतकरी सोयाबीन, हरभरा यांसारख्या पिकांकडे वळत आहेत, तर काहींनी जमीन पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संत्रा निर्यातीचा पाया कमकुवत झाला असून व्यापारीही संत्रा खरेदीपासून दूर राहू लागले आहेत.
प्रादेशिक ओळख पुसली जाण्याची भीती
नागपुरी संत्रा हा केवळ एक फळ नसून विदर्भाची ओळख, अभिमान आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता 'नागपुरी संत्रा नामशेष होतोय' हे विधान वास्तवात उतरत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जर तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर येत्या काही वर्षांत संत्राबागा केवळ इतिहासजमा होतील, अशी गंभीर चिंता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
