अझहर अली
गेल्या पाच वर्षांपासून निसर्गाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची कठोर परीक्षा घेतली आहे. अवेळी पाऊस, चक्रीवादळ, गारपीट, ओला आणि कोरडा दुष्काळ, तसेच अतिवृष्टी या साऱ्या आपत्तींचा फटका संत्रा बागांना बसला. (Orange Farmers Crisis)
आता त्यावर भर म्हणजे व्यापाऱ्यांकडून मिळणारे अत्यल्प दर. परिणामी, संत्रा उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले असून, शेतकऱ्यांचे नशीब डागाळलेलेच राहिले आहे. (Orange Farmers Crisis)
अत्यल्प भाव आणि उत्पादन घट; दुहेरी फटका!
सध्या अंबिया बहारातील संत्र्याची तोडणी अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु बाजारात दर केवळ २५० ते ३५० रु. प्रति कॅरेट इतकेच मिळत आहेत. दुसरीकडे उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही.
खत, औषध, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढले; पण भाव मात्र कमी झाले. अशा स्थितीत बागायती शेतकरी हतबल झाला आहे, असे स्थानिक उत्पादक सांगतात.
खत, औषधांचे वाढले दर; मदत अपुरी!
रासायनिक खते, कीटकनाशके आणि मजुरी यांचे दर गेल्या काही वर्षांत दोन ते तीन पट वाढले आहेत. मात्र, शासनाकडून मिळणारी मदत अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. सरकार मदत जाहीर करते, पण ती प्रत्यक्ष मिळेपर्यंत नुकसान भरून निघत नाही, अशी तक्रार अनेक शेतकऱ्यांची आहे.
४,३२९ हेक्टरवरील संत्रा बागांना मोठा फटका
संग्रामपूर तालुक्यात तब्बल ४ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रावर संत्रा बागा आहेत. यंदा अतिवृष्टी आणि हवामानातील अति पर्जन्यमानामुळे आंबिया व मृग बहार जवळजवळ पूर्णतः नष्ट झाला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून, उत्पन्नात तीव्र तूट निर्माण झाली आहे.
भरपाईतही अन्याय हजारो शेतकरी वंचित
अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील संत्रा बागांचे नुकसान झाले असले, तरी प्रशासनाने केवळ १ हजार ९३२ हेक्टर क्षेत्र बाधित दाखवले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भरपाईच्या योजनेतून वंचित राहिले. परिणामी, अनेकांना केवळ अर्धवट मदतीवर समाधान मानावे लागले.
दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे संत्रा पिकाचे प्रचंड नुकसान होते. शासनाची भरपाई अपुरी आहे. अत्यल्प प्रमाणात आलेल्या संत्र्याला भाव मिळत नाही; कवडीमोल दराने विकावे लागते.- पवन अग्रवाल, शेतकरी
स्थिती सुधारण्यासाठी अपेक्षा
संत्रा उत्पादकांच्या संकटावर तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत. योग्य बाजारभाव, वेळेवर मदत आणि उत्पादन विमा योजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. अन्यथा, संत्रा नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात बागा उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे.
