Join us

Kanda Bajar Bhav : कांद्याला प्रतिक्विंटल 152 रुपये दर मिळाला, शेतकऱ्याने कांदे गव्हाणीत फेकले! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:35 IST

Kanda Bajar Bhav : राजापूर येथील शेतकऱ्याने नैराश्यातून कांदे जनावरांच्या गव्हाणीत टाकून देत संताप व्यक्त केला.

Kanda Bajar Bhav : केंद्र सरकारने निर्यात मूल्य शून्यावर आणूनही उन्हाळ कांद्याच्या (Unhal Kanda Market) दरातील घट सातत्याने सुरूच आहे. येवला येथील (Yeola Kanda Market) बाजार समितीत विक्रीला आणलेल्या गोल्टी कांद्याला अवघा १५२ रुपये दर मिळाल्याने राजापूर येथील शेतकऱ्याने नैराश्यातून कांदे जनावरांच्या गव्हाणीत टाकून देत संताप व्यक्त केला.

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क (Kanda Niryat Shulk) हटवूनही कांदा बाजारभाव वाढत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी अवघा ९०० रुपये बाजारभाव मिळाल्याने कांदा शेतकऱ्याने जनावरांच्या गव्हाणीत टाकत संताप व्यक्त केला आहे. राजापूर येथील शेतकऱ्याने शेततळ्याच्या पाण्यावर उन्हाळी कांदा पिकवला.

कांद्याचे लिलाव (Kanda Lilav) सुरू होताना १५२ रुपये प्रतिक्विंटल निच्चांकी पातळीवर दर पुकारले गेल्याने शेतकरी निराश झाले. निर्यात मूल्य हटवण्यासह कांदा खरेदीची झालेली घोषणा विचारात घेता दरात सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. मागील महिनाभरात हजार ते बाराशे रुपये सरासरी दर होता. हाच दर आता ८०० ते ९०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. शेतकरी वर्गातुन चिंता व्यक्त केली जात आहे.

दरात सातत्याने घसरण सुरूचतालुक्यातील राजापूर येथील कांदा उत्पादक शेतकरी बापू पांडुरंग विंचू यांनी सात ते आठ क्विंटल कांद्यातील गोल्टी कांदे कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणले होते. त्याला १५२ रुपये प्रतिक्विंटल इतका निच्चांकी बाजारभाव मिळाल्याने उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी खर्चही यातून न मिळाल्याने नाराज झालेल्या बापू विंचू यांनी आपले कांदे परत घरी नेत जनावरांपुढे टाकून संताप व्यक्त केला.

दरम्यान, येवला बाजार समितीत गावरान कांद्याला २०० ते १३६९ तर सरासरी २०० रुपये दर मिळाला. तर उपबाजार अंदरसूल येथे ३०० ते १२२६ तर सरासरी २०० रुपये दर मिळाला.

मेहनतीने पिकवलेल्या कांद्याला मातीमोल दर मिळत असेल तर शेती करावी की नाही हा प्रश्न पडतो. शेतमाल विकून मजुरी आणि भांडवल दूरच वाहतूक खर्चही निघणार नसल्याने कांदे घरी नेऊन शेळ्यांना खाऊ घातले.- बापू विंचू, कांदा उत्पादक शेतकरी, राजापूर

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीनाशिक