Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचा 'हा' तालुका वगळता सर्वच तालुक्यात कांदा लागवड, यंदा लागवडीची सरासरी गाठली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:35 IST

Kanda Lagvad : यंदा कांदा रोपे सडण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे यावर्षी उन्हाळ कांदा लागवडीत घट होण्याची शक्यता होती.

नाशिक : यंदा कांदा रोपे सडण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे यावर्षी उन्हाळ कांदा लागवडीत घट होण्याची शक्यता होती. पण मागील वर्षाची दोन लाख हेक्टरची सरासरी यावर्षीही गाठत ५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात एक लाख ९५ हजार ३८८ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे.

यावर्षी जिल्ह्यात उन्हाळ कांदा लागवडीने मागील वर्षाची सरासरी गाठली आहे. सध्या शेतकऱ्यांची लाल कांदा काढण्याचे कामे सुरू असून बाजार भावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असले तरी ५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात एक लाख ९५ हजार ३८८ हेक्टरवर कांदा लागवड झाली.

जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुका वगळता प्रत्येक तालुक्यात उन्हाळ कांदा लागवड झाले आहे. सर्वात जास्त कांदा लागवड सटाणा तालुक्यात ४७ हजार हेक्टरवर झाली असून त्या खालोखाल मालेगाव तालुक्यात तीस हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. तर सर्वात कमी इगतपुरी तालुक्यात अवघी २४० हेक्टरवर उन्हाळा कांदा लागवड झाली आहे. सध्या शेतकऱ्यांची लाल कांदा काढण्याचे कामे सुरू असून विविध अत्याधुनिक यंत्राचा वापर शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.

जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवडशेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात कांदा रोपे लागवडीसाठी आल्याने मागील वर्षाची सरासरी जानेवारी महिन्यात गाठली. यावर्षी मात्र पाणी चांगले असल्याने अनेक भागात उशिरा कांदेसुद्धा चांगले येऊ शकतात अशी शेतकऱ्यांना आशा आहे. विविध परिसरातील शेतकरी वर्गात आशा पल्लवित झाल्या असुन कांदा लागवडीवर भर दिला जात आहे.

शेतकरी वर्गाची विविध लागवड यंत्राला पसंतीशेती करण्यासाठी शेतकरी विविध तंत्रज्ञानाचा वापर करत असून अनेक शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरवर कांदा लागवड, ट्रॅक्टरने कांदा लागवड यंत्राला पसंती दिली आहे. या यंत्रावर एका दिवसात एक एकर कांदा लागवड केली. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे वेळ व पाण्याची बचत होऊन मजुरांची ही बचत होणार आहे.

तालुकानिहाय उन्हाळ कांद्याची झालेली लागवडनाशिक -९४१, इगतपुरी- २४०, पेठ ३२५, निफाड-१३७५७, सिन्नर-१२७२६, येवला-१५०५५, चांदवड-१५२३०, मालेगाव-३०५५२, सटाणा-४७३०४, नांदगाव-१०७०४, कळवण-२१५३५, दिंडोरी-३७५०, सुरगाणा-५९४, देवळा -२२६७३, त्र्यंबकेश्वर -० एकूण -१,९५,३८८

उत्पादन पुढील हवामानावर अवलंबूनयावर्षी उन्हाळ कांद्याच्या लागवड खर्चामध्ये वाढ झाली असून टाकलेल्या रोपांवर शेतकऱ्यांनी कांदा लागवडी केल्या आहे. रोगट हवामानामुळे कांदा उत्पादन किती निघते हे पुढील वातावरणावर अवलंबून राहणार आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात रोगट हवामान असल्याने कांद्याची वाढ पाहिजे अशी होताना दिसत नाही. त्यामुळे औषधांच्या खर्चात वाढ होत असून मोठ्या प्रमाणात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. आता उन्हाळ्याची चाहूल लागत असून कांदे मात्र अजून जमीन सोडायला तयार नाही.- किशोर कुऱ्हाडे, शेतकरी, जळगाव नेऊर

टॅग्स :कांदालागवड, मशागतनाशिकशेतीशेती क्षेत्र