Oilseed Crop : राज्यात रब्बी हंगामातील पेरणी उशिरा सुरू झाल्याने यंदा तेलबिया लागवडीचे क्षेत्र लक्षणीयरीत्या घटले असून परिणामी चालू हंगामात तेलबिया उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Oilseed Crop)
कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार, राज्यातील एकूण तेलबिया पेरणी सरासरीच्या केवळ ४३ टक्क्यांपर्यंतच पोहोचली आहे.(Oilseed Crop)
राज्यातील तेलबिया पिकांमध्ये करडई, जवस, तीळ व सूर्यफूल या प्रमुख पिकांचा समावेश आहे. मात्र, यंदा करडई वगळता इतर तेलबिया पिकांकडे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे.(Oilseed Crop)
करडईचा एकट्याचा ७१ टक्के वाटा
राज्यात तेलबियांचे एकूण सरासरी क्षेत्र ७० हजार ७७ हेक्टर असून त्यापैकी यंदा केवळ ३० हजार ६१ हेक्टर क्षेत्रावरच प्रत्यक्ष लागवड झाली आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रापैकी तब्बल ३० हजार ५२१ हेक्टर म्हणजेच ७१ टक्के क्षेत्र एकट्या करडई पिकाखाली आहे. यंदा करडईची प्रत्यक्ष पेरणी २१ हजार ६४७ हेक्टरवर झाली असून सरासरीच्या तुलनेत ती समाधानकारक मानली जात आहे.
उत्पादन खर्च कमी, दुष्काळी परिस्थितीत तग धरून राहण्याची क्षमता आणि बाजारात असलेली तुलनेने स्थिर मागणी यामुळे शेतकऱ्यांचा कल करडईकडे अधिक असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
जवस व तिळाची लागवड घटली
करडईनंतर जवस व तीळ या पिकांचे क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. जवसाची लागवड केवळ १८ टक्के क्षेत्रावर, तर तिळाची लागवड १३ टक्के क्षेत्रावरच झाली आहे. योग्य पावसाअभावी व उशिरा पेरणीचा धोका लक्षात घेता अनेक शेतकऱ्यांनी ही पिके टाळल्याचे स्पष्ट होत आहे.
सूर्यफुलाची लोकप्रियता कमी
तेलबिया पिकांमध्ये सूर्यफुलाची लोकप्रियता सातत्याने कमी होत चालली आहे. राज्यात सूर्यफुलाचे सरासरी क्षेत्र ६ हजार ४०३ हेक्टर असताना यंदा प्रत्यक्षात फक्त ५५४ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. त्यामुळे सूर्यफुलाच्या पेरणीत अवघी ९ टक्के नोंद झाली आहे. उत्पादन खर्च, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारभावातील अस्थिरता ही यामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत.
विभागनिहाय तेलबिया पेरणी
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, नागपूर विभागात २६ टक्के, अमरावती २४ टक्के, पुणे १० टक्के, कोल्हापूर ९ टक्के, छत्रपती संभाजीनगर ८ टक्के, कोकण १८ टक्के, नाशिक ३ टक्के तर लातूर विभागात ७१ टक्के क्षेत्रावर करडईची पेरणी झाल्याचे दिसून येते.
पुढील काळातील स्थिती चिंताजनक
अहवालानुसार पुढील काही दिवसांत उशिराची पेरणी मर्यादित प्रमाणातच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू वर्षात तेलबिया उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. करडईवरच अधिक अवलंबून राहिल्याने भविष्यात बाजारभाव संवेदनशील होण्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एकूणच, यंदा तेलबिया लागवडीत विविधतेचा अभाव दिसून येत असून जवस, तीळ व सूर्यफुलासारख्या पिकांचे क्षेत्र घटल्याने राज्याच्या तेलबिया उत्पादनावर नकारात्मक परिणाम होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
