Oilseed Crisis : राज्यात तेलबिया पिकांमध्ये एकेकाळी महत्त्वाचे स्थान असलेले सूर्यफूल पीक आता हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. (Oilseed Crisis)
उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण ३४ जिल्ह्यांपैकी तब्बल २० जिल्ह्यांत चालू हंगामात सूर्यफुलाची लागवड शून्य नोंदविण्यात आली आहे. ही स्थिती राज्याच्या खाद्यतेल उत्पादनाच्या दृष्टीने धोक्याची घंटा मानली जात आहे.(Oilseed Crisis)
उत्पादन खर्च, बाजारभाव आणि हमीभावाचा अभाव
सूर्यफुलाच्या लागवडीत घट होण्यामागे उत्पादन खर्चात झालेली लक्षणीय वाढ, बाजारभावातील अस्थिरता, प्रभावी हमीभावाचा अभाव तसेच सोयाबीन, हरभरा, कापूस यांसारख्या तुलनेने हमखास उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल ही प्रमुख कारणे असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात.
एकेकाळी तेलबिया पिकांमध्ये अग्रस्थानावर असलेले सूर्यफूल आज शेतकऱ्यांच्या पसंतीतून जवळपास हद्दपार होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
खाद्यतेल उत्पादनावर होणार परिणाम
सूर्यफुलाच्या लागवडीत झालेल्या घटेचा थेट परिणाम राज्यातील खाद्यतेल उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. भविष्यात खाद्यतेलासाठी आयातीवर अधिक अवलंबून राहावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तेलबिया उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट धोक्यात येत असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
विदर्भात सूर्यफूल पीक जवळपास नामशेष
विदर्भातील अकराही जिल्ह्यांत सूर्यफुलाचे पीक जवळपास नामशेष झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. विशेष म्हणजे विदर्भात केवळ बुलढाणा जिल्ह्यातच सूर्यफुलाचे क्षेत्र असून तेही सुमारे ३३ टक्क्यांपुरते मर्यादित आहे. उर्वरित अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत सूर्यफुलाची लागवड झालेली नाही.
राज्यात केवळ १२ टक्के क्षेत्रावर लागवड
राज्यात सूर्यफुलाचे सरासरी क्षेत्र सुमारे ६ हजार ४०३ हेक्टर आहे. मात्र चालू हंगामात यापैकी केवळ ७९८ हेक्टर, म्हणजेच सुमारे १२ टक्के क्षेत्रावरच सूर्यफुलाची लागवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित बहुतांश क्षेत्र इतर पिकांनी व्यापले असून सूर्यफुलाची शेती झपाट्याने घटत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
विभागनिहाय सूर्यफुलाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
लातूर – २६७
पुणे – २३४
नाशिक – १२१
छत्रपती संभाजीनगर – ७६
कोल्हापूर – ४८
अमरावती – २९
कोकण – २४
नागपूर – ०
बाजारपेठ आणि धोरणाची गरज
सूर्यफुलासारख्या तेलबिया पिकांना पुन्हा चालना देण्यासाठी शासनाने ठोस धोरण आखणे, प्रभावी हमीभाव जाहीर करणे आणि शेतकऱ्यांना खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे मत कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा येत्या काही वर्षांत राज्यातून सूर्यफूल पीक पूर्णतः गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही जाणकारांनी दिला आहे.
