NDCC Bank :नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून (Nashik Jilha Bank) सक्तीची कर्ज वसुली करून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नावे लावण्यात येतात. ते तात्काळ रद्द करावे. राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस करावे. शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उताऱ्यावर लावलेली नावे रद्द करावी. संपूर्ण शेतकऱ्यांचा कर्ज माफ करून सातबारा खाते (Satbara) उतारा कोरा करावा, अशा आशयाचे निवेदन देत नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) शेतकऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या कर्ज वसुलीविरोधात व संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी नाशिक येथे १ जून 2023 पासून म्हणजेच जवळपास 19 महिन्यापासून व 570 दिवसापासून आंदोलन (Farmer Protest) सुरू आहे. मात्र शासनाने अद्यापही या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपल्या निवेदनाप्रमाणे शासनास कळवतो, असे शिष्टमंडळाला सांगितले.
दरम्यान ३ मार्च रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनातही सहभागी व्हावे, असे आव्हान भगवान बोराडे यांनी केले आहे. दहा तारखेला अर्थसंकल्पात कर्जमाफीच्या संदर्भात व बँकेच्या संदर्भात योग्य तो निर्णय झाला नाही, तर १० तारखेनंतर मुंबई येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येईल, असे आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे.
जिल्हा बँकेचा प्रश्न निकाली काढावा ...
महाराष्ट्र राज्यातील त्यांच्या सभासदांची कर्जमाफी 2008 पासून मागणी करीत आहोत, मात्र हे सरकार अजूनही त्यात दात देत नाही. 2008 मध्ये एक लाख 53 हजार सभासदांकडे 363 कोटी एवढी थकबाकी होती. आता ही थकबाकी 1400 कोटीवर गेली असून तेही माफ करावे. नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांना नाशिक जिल्हा बँकेमध्ये लक्ष घालण्यासाठी त्या त्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी विनंती करावी. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रश्न निकाली काढावा, असे यावेळी आव्हान करण्यात आले.