Natural Farming : वाशिम जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला बळकटी देण्यासाठी कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेमार्फत प्रभावी आणि शाश्वत पावले उचलली जात आहेत.(Natural Farming)
या उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळत असून, सात शेतकरी उत्पादक कंपन्यांशी संलग्न तब्बल ३ हजार ५०० शेतकरी एकत्र येत २० नैसर्गिक संसाधन केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना शेताच्या धुऱ्यावरच दर्जेदार, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या दरात नैसर्गिक कृषी निविष्ठा उपलब्ध होत आहेत.(Natural Farming)
नैसर्गिक निविष्ठांची निर्मिती आणि विक्री
नैसर्गिक संसाधन केंद्रांमध्ये जीवामृत, गोकृपामृत, घनजीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, सेंद्रिय कीडनाशके, जैवखते तसेच गांडूळखत आदी नैसर्गिक कृषी निविष्ठांची निर्मिती व विक्री केली जात आहे.(Natural Farming)
विशेष म्हणजे, ही सर्व उत्पादने शेतकरीच शेतकऱ्यांसाठी तयार करत असल्याने गुणवत्तेबाबत विश्वास निर्माण झाला आहे. बाजारातून महागड्या रासायनिक किंवा मिश्र निविष्ठा खरेदी करण्याची गरज कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात लक्षणीय घट होत आहे.
उत्पादन खर्चात बचत, शेतकरी स्वावलंबी
नैसर्गिक शेतीकडे वळल्याने उत्पादन खर्चात बचत होत असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुलभ होत आहे. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होत असल्याने मातीची सुपीकता टिकून राहण्यास मदत मिळत आहे.
परिणामी नैसर्गिक शेती ही केवळ पर्यावरणपूरकच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही शाश्वत ठरत असल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात दिसून येत आहे.
प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि अनुभवांचे आदान-प्रदान
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण, प्रात्यक्षिके तसेच अनुभवांचे आदान-प्रदान या उपक्रमांवर भर देण्यात येत आहे.
नैसर्गिक शेती पद्धतीमुळे जमिनीचा कस टिकून राहतो, पिकांचे उत्पादन स्थिर राहते आणि उत्पादनाचा दर्जाही सुधारतो, असा अनुभव अनेक शेतकरी मांडत आहेत.
पर्यावरणपूरक शेतीकडे वाढता कल
रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, पर्यावरणपूरक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. नैसर्गिक संसाधन केंद्रांमुळे आवश्यक निविष्ठा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होत असल्याने नैसर्गिक शेतीचा स्वीकार अधिक सुलभ झाला आहे.
भविष्यात हा उपक्रम जिल्ह्याच्या कृषी अर्थकारणाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे मत कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
अधिक शेतकऱ्यांना जोडण्याचा मानस
वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नैसर्गिक संसाधन केंद्रांमुळे शेतकऱ्यांना शेताच्या धुऱ्यावरच दर्जेदार व प्रमाणित नैसर्गिक कृषी निविष्ठा उपलब्ध होत आहेत. यामुळे उत्पादन खर्चात बचत होत असून मातीची सुपीकता टिकून ठेवता येत आहे. पुढील काळात अधिक शेतकऱ्यांना या अभियानाशी जोडून नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्याचा मानस आहे. - अनिसा महाबळे, प्रकल्प संचालक, आत्मा
हे ही वाचा सविस्तर : Natural Farming : नैसर्गिक शेतीला मोठी चालना; सरकार देणार अनुदान वाचा सविस्तर
