नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना लि. पळसे संचलित अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल अँड एनर्जी लि. यांनी २०२५-२०२६ च्या गाळप हंगामातील उसाचे पेमेंट अद्याप थकवल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. हे थकीत पेमेंट तत्काळ मिळावे, अन्यथा कारखान्यासमोर किंवा संचालकांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. अष्टलक्ष्मी शुगर कारखान्याने हंगामाच्या सुरुवातीला रोख स्वरूपात पेमेंट देण्याचे आश्वासन देऊन नाशिक जिल्हा व इतर क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी घेतला होता. सुरुवातीला काही मोजक्या शेतकऱ्यांना पेमेंट देऊन विश्वास संपादन करण्यात आला, मात्र त्यानंतर सुमारे ५०० हून अधिक शेतकऱ्यांची रक्कम गेल्या तीन महिन्यांपासून रखडली आहे.
ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ नुसार, ऊस मिळाल्यापासून १४ दिवसांच्या आत किमान एफ.आर.पी. प्रमाणे रक्कम अदा करणे बंधनकारक आहे. विलंब झाल्यास १५ टक्के दराने व्याज देण्याची तरतूद आहे. मात्र, कारखान्याने या नियमांना धाब्यावर बसवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीशेतकऱ्यांनी वारंवार विचारणा केली असता, कारखाना प्रशासनाकडून बँक खात्याची अडचण असल्याचे कारण सांगून तारखा दिल्या जात आहेत. ऊस हे १४ महिन्यांचे पीक असून त्यावर मोठा खर्च होतो. मुलांचे शिक्षण, पीककर्ज, लग्नाचे कार्य आणि शेतीचे भांडवल यासाठी शेतकरी याच पैशांवर अवलंबून आहेत. मात्र, कारखाना अधिकारी व कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याने आणि कार्यालयात हजर राहत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. काही शेतकऱ्यांनी तर आत्मदहनाचा इशाराही दिला आहे.
शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जर प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई केली नाही आणि पेमेंट मिळवून दिले नाही, तर होणाऱ्या तीव्र आंदोलनास प्रशासन आणि साखर कारखाना जबाबदार राहील.- निवृत्ती गारे (पाटील), जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Web Summary : Nashik's Ashtalakshmi Sugar factory hasn't paid farmers for their sugarcane from the 2025-2026 season, sparking outrage. The Swabhimani Shetkari Sanghatana warns of protests if payments aren't made promptly, citing financial hardship and violation of payment regulations.
Web Summary : नाशिक की अष्टलक्ष्मी शुगर फैक्ट्री ने 2025-2026 सीज़न के गन्ने का भुगतान किसानों को नहीं किया, जिससे आक्रोश है। स्वाभिमानी शेतकरी संघटना ने भुगतान न होने पर विरोध प्रदर्शन की चेतावनी दी है, वित्तीय कठिनाइयों और भुगतान नियमों के उल्लंघन का हवाला दिया।