Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mosambi Baga : मोसंबी बागा जमीनदोस्त; कमी भावामुळे शेतकऱ्यांचा टोकाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 15:24 IST

Mosambi Baga : मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडले असून कमी बाजारभाव, प्रचंड फळगळ आणि रोगराईमुळे शेती तोट्यात गेली आहे. या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांनी थेट आपल्या मोसंबी बागा जेसीबीने उखडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ५०० झाडे जमीनदोस्त झाल्याच्या घटनेमुळे कृषी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.(Mosambi Baga)

दीपक ढोले

जालना जिल्ह्याची ओळख असलेली मोसंबी आता संकटात सापडली असून, शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. (Mosambi Baga)

सततची फळगळ, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारात मिळणारे कवडीमोल दर यामुळे ब्राह्मणखेडा येथे शेतकरी ज्ञानेश्वर डवले यांनी तब्बल ५०० मोसंबीची झाडे जेसीबीद्वारे उपटून टाकल्याची घटना समोर आली आहे.(Mosambi Baga)

'मोसंबीचे आगार' ओळख धोक्यात

एकेकाळी 'मोसंबीचे आगार' म्हणून ओळख असलेला जालना जिल्हा आता ही ओळख गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणावर मोसंबीच्या बागा काढून टाकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बागा काढण्यामागील प्रमुख कारणे

* बाजारात मिळणारा कवडीमोल भाव

* बुरशीजन्य रोग व किडींचा वाढता प्रादुर्भाव

* मोठ्या प्रमाणावर फळगळ

* अवेळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपीट

* हवामानातील सतत बदल

* संशोधन व मार्गदर्शनाचा अभाव

दरात मोठी घसरण

मोसंबीच्या दरातही लक्षणीय घट झाली आहे.

२०२४-२५ हंगाम

आंबे बहार: १३,००० ते २५,००० रु. (प्रतिटन)

मृग बहार: १६,००० ते २८,००० रु.

२०२५-२६ हंगाम

आंबे बहार: ९,००० ते २१,००० रु.

मृग बहार: ७,००० ते २०,००० रु.

दरात झालेली ही घसरण शेतकऱ्यांच्या तोट्यात भर घालत आहे.

लागवड क्षेत्र स्थिर, पण संकट कायम

२०२४-२५: २९,५४५ हेक्टर

२०२५-२६: २९,५२४ हेक्टर

लागवड क्षेत्र जवळपास स्थिर असले तरी उत्पादन आणि नफा घटल्याने बागा टिकवणे कठीण झाले आहे.

जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी 'मोसंबीचे आगार' ही ओळख इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कमी दर, वाढता खर्च आणि हवामानातील बदल यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी गंभीर संकटात सापडले असून तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

हवामानाचा मोठा फटका

गेल्या काही वर्षांत हवामानातील अनिश्चितता वाढली आहे. अवेळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे मोसंबी पिकावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे उत्पादन घटले आणि दर्जाही खालावला.

शेतकऱ्यांचा आक्रोश

दरात वाढ नाही आणि मंगुरोगासह प्रचंड फळगळ यामुळे बाग सांभाळणे अशक्य झाले. अखेर आठ एकरांतील बाग काढावी लागली.- रामेश्वर राहणे, शेतकरी

खर्च वाढतोय आणि उत्पन्न कमी होतंय. त्यामुळे सहा एकरांतील मोसंबी बाग काढून टाकली.- बाबासाहेब ढोले, शेतकरी

संघटनांचा सरकारवर आरोप

कवडीमोल दर, रोगराई आणि हवामान बदलामुळे शेतकरी अडचणीत आहेत. संशोधन केंद्रे निष्क्रिय ठरत असून शासनाची अनास्था ही मोठे कारण आहे.- सुरेश काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष

कृषी विभागाचे आवाहन

शेतकरी बागा काढत आहेत हे वास्तव आहे. मात्र त्यांनी घाईने निर्णय घेऊ नये. तज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.- गहिनीनाथ कापसे, जिल्हा कृषी अधीक्षक

हे ही वाचा सविस्तर :Jowar Fodder : ज्वारी कडबा महागला; कारण काय? वाचा सविस्तर

अधिक वाचा :Heatwave Health Tips : उन्हामुळे शरीर ‘ड्राय’ होतंय? काय खावे-टाळावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

English
हिंदी सारांश
Web Title : Sweet lime orchards destroyed: Farmers' drastic decision due to low prices.

Web Summary : Jalna's sweet lime farmers face crisis due to low prices, disease, and weather. A farmer destroyed 500 trees. Once known as the 'Sweet Lime Hub,' the region is losing its identity as farmers remove orchards due to losses.
टॅग्स :शेती क्षेत्रफळेशेतकरीशेती