- संजय तिपाले
गडचिरोली : जंगलावर निर्भर असलेल्या आदिवासींच्या उत्पन्नांच्या महत्त्वाच्या स्रोतांपैकी एक म्हणजे मोहवृक्ष (Mahua). या झाडाशी त्यांचे पिढ्यान् पिढ्यांचे नाते. वन्यप्राण्यांच्या दहशतीत कष्टाने गोळा केलेल्या मोहफुलांच्या खरेदी-विक्रीमध्ये सुसूत्रतेचा अभाव आहे. त्याचा फटका मोहफुले संकलित करणाऱ्यांना बसतो.
चार वर्षांपूर्वी मोहफुलांची विक्री (Mahua Market) व वाहतुकीवरील बंदी उठवली, पण वनव्याप्त, आदिवासीबहुल गडचिरोलीत (Gadchiroli) मोहफुलांवर आधारित प्रक्रिया उद्योग अजून उभे राहू शकले नाहीत. त्यामुळे मेहनतीने संकलित केलेल्या मोहफुलांना योग्य दाम मिळत नाही. प्रक्रिया उद्योगांतून विकासाच्या, रोजगाराच्या नव्या वाटा धुंडाळण्यासाठी आदिवासींच्या या कल्पवृक्षाला राजाश्रय कधी मिळणार? यासाठी असलेल्या अडचणींवर टाकलेला प्रकाशझोत.
बियांपासून बायोडिझेल बनविता येऊ शकते. उत्तम प्रतीचे सॅनिटायझर लाडू, चिक्की, गुलाबजामून, बर्फी या खाद्यपदार्थांची निर्मितीही करता येते. सोबतच साबण, औषधी, सुगंधी द्रव्य, सॉफ्ट ड्रिंक, पशुखाद्य अशी अनेक उत्पादनेदेखील तयार करता येऊ शकतात. गर्दहिरव्या घनदाट जंगलात मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या मोहफुलांचा जिल्ह्याचा हक्काचा ब्रँड विकसित करण्यास पुष्कळ वाव आहे.
यापूर्वी वनउपजापासून वनौषधीचा प्रयोग झाला, पण या उत्पादनांची झेप जिल्ह्याबाहेर होऊ शकली नाही. मोहवृक्षाच्या फुले, फळ, बिया, साल व लाकडाचाही योग्य वापर कसा करता येईल, यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. मात्र, त्याकरता व्यापक दृष्टीने विचार करण्याची गरज आहे.
प्रक्रिया उद्योगांतून 'बहुगुणी' फायदे
मोहफुलांमध्ये नैसर्गिक पोषकतत्त्वे आहेत. त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास त्याचे 'बहुगुणी' फायदे आहेत. त्यासाठी मोहफुलांवर आधारित प्रक्रिया उद्योगांना आर्थिक साहाय्य, प्रशिक्षण, उत्पादने व विक्री यासंदर्भात मार्गदर्शन गरजेचे आहे. जंगलात सहज उपलब्ध होणारी मोहफुले संकलित करून ठेवण्यासाठी अद्ययावत गोदामांची आवश्यकता आहे.
अंगणवाडी, आश्रमशाळा, मध्यान्ह भोजनात मोहफुलांचे लाडू वितरित केल्यास कुपोषित बालकांचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. बचत गट, सुशिक्षित बेरोजगार यांच्या माध्यमातून हे प्रक्रिया उद्योग राबविल्यास मोहफुलांनाही योग्य दाम मिळेल. शेतीच्या बांधावरील तसेच जंगलातील अधिकाधिक मोहफुले नागरिक गोळा करतील.
मोहफुले खरेदी-विक्रीवर कोणाचे नियंत्रण ?
जिल्ह्यात एक कुटुंब साधारण ६० ते ८० किलो मोहफुले संकलित करतात, पण शासनाकडून ती खरेदी केली जात नाहीत. त्यामुळे खरेदी-विक्रीवर थेट नियंत्रण नाहीं. छत्तीसगड, तेलंगणाचे व्यापारी येतात, तेच या फुलांचे दर ठरवतात व मोहफुले घेऊन जातात. मोहफुलांना प्रतिकिलो ४० रुपये दर मिळतो. मात्र, ते संकलित करण्यासाठी लागणारा वेळ, सोसावे लागणारे कष्ट या घामाचे मोल कधी होणार आहे की नाही.
विशेष म्हणजे व्यापारासाठी मोहफुलांची साठवणूक व वाहतूक करायची असेल तर उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. या अटी, शर्थीची पूर्तता करताना दमछाक होते, त्यामुळे मोहफुलांची खरेदी करण्यासाठी बाहेरून येणारे व्यापारीही मोजकेच असतात. साहजिकच खरेदीदारांमध्ये स्पर्धा होत नाही. दारूबंदी असल्यामुळे मोहफुले खरेदी-विक्रीची पंचाईत. खरेदीदाराने ठरवलेले दर घ्या अन् गपगुमान राहा... अशीच सध्याची स्थिती आहे.