विश्वास कांबळे
पावसाळा ओसरला की जंगल नुसते हिरवे राहत नाही, तर ते जिवंत होतं. दसरा-दिवाळीच्या दरम्यान फुललेली रंगीबेरंगी रानफुलं, त्यांचा दरवळणारा सुगंध आणि शांत डोंगरदऱ्या.
या वातावरणातच आदिवासी जीवनाचा खरा संघर्ष आणि यशाची बीजं रुजलेली असतात. या सुगंधाच्या मागावर असतात मधमाशाआणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत असतात मांडवी परिसरातील आदिवासी मध संकलक.
मध संकलन हा या भागातील आदिवासी मजुरांसाठी केवळ हंगामी व्यवसाय नाही, तर तो बारमाही उदरनिर्वाहाचा मजबूत आधार ठरला आहे. एकेकाळी अवघ्या ३०० रुपये किलो दराने विकला जाणारा नैसर्गिक मध आज ९०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. कष्ट, अनुभव आणि विश्वासार्हतेमुळे या मधाने सोन्यासारखं मूल्य मिळवलं आहे.
लहान मोहाळ की आग्या मोहाळ? ज्ञानातून वाढलेलं उत्पन्न
जंगलात आढळणाऱ्या मधाचे दोन प्रमुख प्रकार आदिवासी बांधव ओळखतात आणि हाच त्यांचा खरा अनुभवाचा ठेवा आहे.
लहान मोहाळ
हे मथ झाडांच्या खोडात, शेताच्या धुरे-बंधाऱ्यांत किंवा दगडांच्या कपारीत आढळते. आकाराने लहान असलं तरी यामधील औषधी गुणधर्म प्रचंड आहेत. स्थानिक वैद्य आणि जाणकार लोक याला मोठं महत्त्व देतात.
आग्या मोहाळ
उंच झाडांच्या फांदीवर सुपाच्या आकारात लटकलेलं हे मोहाळ अधिक धोकादायक, पण तितकंच फायदेशीर. एका मोहाळातून तब्बल एक बादलीपर्यंत मध निघतो. हा मध उसाच्या पाकासारखा दाट, गडद आणि गुणकारी असतो. सर्दी, खोकला, दमा यांसारख्या आजारांवर तो रामबाण उपाय मानला जातो. शहरांमध्ये या मधाला मोठी मागणी असून, जुना मध अधिक गुणकारी समजला जातो.
विळा, कोयता आणि धैर्य… झिरो बॅलन्सचा व्यवसाय
भांडवल जवळजवळ शून्य!
दररोज पहाटे हे आदिवासी मजूर घराबाहेर पडतात. सोबत असतं फक्त विळा,कोयता, कुन्हाड, मध गाळण्यासाठी सुती कापड आणि आगपेटी
पैनगंगा नदीकाठचा परिसर उनकेश्वर, खंबाळा, पार्डी, अंबाडी घाटाखालचा जवरला, ठाकूरवाडी, भिलगाव… या घनदाट जंगलात जीव धोक्यात घालून ही मंडळी मधाचा शोध घेतात. वाघ, साप, दरी-खोरी आणि मधमाश्यांचा हल्ला सगळ्या संकटांशी दोन हात करत हा व्यवसाय सुरू असतो.
कष्टाचं अमृत, घरखर्चाचा आधार
हा धंदा झिरो बॅलन्सचा असला तरी आमच्यासाठी मोठा आधार आहे. जंगलात फिरताना जीवाची भीती असते, पण पोटासाठी हे अमृत गोळा करतो. यातून आमचा घरखर्च भागतो. - जगन संजय सिडाम, मांडवी
मध संकलनामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतर टळलं आहे. मुलांचं शिक्षण, घरखर्च, सण-उत्सव सगळ्याला या मधातून आधार मिळतो. कोणतीही सरकारी सबसिडी नाही, आधुनिक यंत्रणा नाही, तरीही निसर्गावर विश्वास ठेवून उभी राहिलेली ही यशकथा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.
निसर्गाशी सुसंवाद हाच खरा विकास
ही कथा केवळ मधाची नाही, तर निसर्गाशी सुसंवाद साधत जगण्याची आहे. जंगल न तोडता, पर्यावरणाचा समतोल राखत, परंपरागत ज्ञानाच्या बळावर उभं राहिलेलं हे आदिवासी अर्थकारण स्मार्ट शेतीपेक्षा अधिक शाश्वत आहे.
वेचलेलं मोहाळ आज खरंच सोन्यासारखं झालं आहे पण त्याहून मौल्यवान आहे कष्ट, जिद्द आणि निसर्गावरचा अढळ विश्वास.
