सोमनाथ खताळ
हातामध्ये कोयता, डोक्यावर उसाची मोळी आणि डोळ्यांत उद्याच्या भविष्याची चिंता… हीच आजवर बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची ओळख होती. मात्र, आता हे चित्र झपाट्याने बदलत आहे. ज्या हातांनी वर्षानुवर्षे ऊस तोडला, तेच हात आता फडावर जखमा स्वच्छ करत आहेत, पट्टी बांधत आहेत आणि आजारी मजुरांना दिलासा देत आहेत.(Mission Sathi)
ऊसतोड महिलांच्या गंभीर आरोग्य प्रश्नांमधून जन्माला आलेली 'मिशन साथी' ही योजना आज हजारो मजुरांसाठी 'लाईफलाईन' ठरत असून, आरोग्य साथी म्हणून निवड झालेल्या महिलांची ओळख आता फडावर डॉक्टर मॅडम म्हणून होत आहे.(Mission Sathi)
गर्भपिशवी शस्त्रक्रियांचे धक्कादायक वास्तव
काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिलांमध्ये गर्भपिशवी (गर्भाशय) काढण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. कामात खंड पडू नये, सततच्या वेदना आणि आरोग्याच्या तक्रारींमुळे अनेक महिलांनी अतिशय टोकाचा निर्णय घेतला होता.
२ जून २०२५ रोजी तब्बल ८४३ महिलांच्या गर्भपिशवी काढण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या गंभीर प्रश्नाकडे लोकमतने सातत्याने लक्ष वेधले. याची दखल घेत शासन व प्रशासन स्तरावर हालचालींना वेग आला.
'मिशन साथी'ची सुरुवात, फडावर पोहोचली आरोग्य यंत्रणा
या पार्श्वभूमीवर आरोग्य व सामाजिक न्याय विभागाने ऊसतोड मजुरांसाठी 'मिशन साथी' ही अभिनव संकल्पना राबवली. ऊसतोड मजुरांमधीलच महिलांची निवड करून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आणि आरोग्याचे पहिले रक्षक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.
उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ७ ऑगस्ट २०२५ रोजी बीडमधून या योजनेचा शुभारंभ झाला. याच वेळी हजारो ऊसतोड महिलांची आरोग्य तपासणी व नोंदणी करण्यात आली.
औषध पेटी आणि १२१२ हेल्पलाईनचा आधार
प्रत्येक आरोग्य साथीला अद्ययावत औषध पेटी देण्यात आली आहे. यामध्ये पॅरासिटामॉल, ओआरएस, सोफ्रामायसिन, पट्ट्या, थर्मामीटर, ओळखपत्र आणि मराठीत माहिती पुस्तिका यांचा समावेश आहे.
औषधे संपल्यास जवळच्या कोणत्याही शासकीय दवाखान्यातून ती मोफत मिळण्याची व्यवस्था आहे. तसेच मजुरांच्या कोणत्याही अडचणींसाठी १२१२ हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
आरोग्य साथींची कामे काय?
* आरोग्य साथी महिलांकडून फडावरच प्राथमिक उपचार दिले जात आहेत.
* ताप, अंगदुखी, मळमळ, उलटी, जुलाब, निर्जलीकरण
* त्वचारोग, खाज-खरुज
* कोयत्यामुळे होणाऱ्या जखमा, पू येणे, जखम स्वच्छ करणे व पट्टी बांधणे
* ताप मोजणे, प्राथमिक तपासणी
आजार गंभीर असल्यास रुग्णाला जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी संदर्भ सेवा दिली जाते. तसेच महिलांमध्ये अनावश्यक गर्भपिशवी शस्त्रक्रिया टाळण्यासाठी समुपदेशन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाते.
आकडे काय सांगतात...
एकूण ऊसतोड कामगार : ९३,०५९
पुरुष : ५०,०२६
महिला : ४३,०३३
आरोग्य साथी : ७७०
वितरित हेल्थ कार्ड : ९२,४४५
लसीकरण झालेली बालके : ५,७२०
गरोदर माता : ७१९
परळी, वडवणी, पाटोदा, गेवराई, माजलगाव तालुक्यांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.
कष्टाचं जीवन, पण मिळतोय आधार
ऊसतोड कामगारांचे जीवन अत्यंत खडतर आहे. पहाटे ३ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत १२ ते १५ तास कठीण श्रम करावे लागतात. स्थलांतरामुळे त्यांना फडावर तात्पुरत्या पालात राहावे लागते, जिथे स्वच्छ पाणी, वीज आणि शौचालयांचा अभाव असतो.
पूर्वी सरकारी यंत्रणेशी संपर्क तुटत असे. मात्र आता आरोग्य यंत्रणाच थेट फडावर पोहोचली आहे. त्यामुळे केवळ जीव वाचत नाहीत, तर मजुरांचा आत्मविश्वासही वाढतो आहे.
'बीड पॅटर्न' ठरतोय आदर्श
आरोग्य साथी महिलांना जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, सीईओ जीतीन रहेमान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.
आरोग्य साथी महिलांना प्रथमोपचार, मासिक पाळीतील स्वच्छता आणि गरोदर मातांची काळजी याबाबत प्रशिक्षण दिले आहे. त्या आता फडावरच आधार देत आहेत. - डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
