इब्राहीम जहागिरदार
दसरा आणि दिवाळीसारख्या सणांच्या तोंडावर चांगला नफा मिळेल या आशेने कुरुंदा परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. मात्र, यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न धोक्यात आले आहे. (Marigold Flower Damage)
शेतात साचलेल्या पाण्यामुळे झेंडूच्या फुलांचे अतोनात नुकसान झाले असून, लागवडीसाठी केलेला खर्च सुद्धा वाया गेला आहे.(Marigold Flower Damage)
अतिवृष्टीचे परिणाम
कुरुंदा, पांगारा (शिंदे), कवठा, आंबाचोंडी, गिरगाव, बागल (पारडी), परजना अशा अनेक गावांमध्ये झेंडूची लागवड केली होती. शेतकऱ्यांना दसरा व दिवाळीच्या काळात फुलांना चांगली मागणी व उच्च भाव मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील परिस्थिती बदलली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पाणी साचल्यामुळे फुले काळवट पडली असून अनेक झाडे भुईसपाट झाली आहेत. यामुळे फुलांची विक्री होणे कठीण झाले असून व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी पाठ फिरवली आहे.
शेतकरी काय सांगतात
दसरा आणि दिवाळीसाठी मी जवळपास दोन एकरांमध्ये झेंडूची लागवड केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे झेंडूचा मळा होता की नव्हता असे वाटू लागले आहे. यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. - रामकिशन शिंदे
मी दरवर्षी फुलांची लागवड करतो. यावर्षी सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आणि झेंडूचे अतोनात नुकसान झाले. खरीप हंगामातील पिकांसोबतच झेंडूच्या फुलांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. महसूल व कृषी कर्मचाऱ्यांनी शिवारात जाऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. - सोपानराव शिंदे
शेतकऱ्यांची मागणी
शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, पावसामुळे झालेल्या नुकसानाची नोंद घेऊन त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवावी. तसेच सणांच्या काळात फुलांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न केले जावेत.
सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झेंडूच्या फुलांचे नुकसान हा शेतकऱ्यांसाठी मोठा फटका ठरला आहे. यामुळे फुलांच्या लागवडीसाठी केलेला खर्च वाया गेला असून शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गंभीर झाले आहे. स्थानिक प्रशासन व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे.
