Marigold Cultivation : सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या उमरा महसूल मंडळातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात तुरीच्या पिकात आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली आहे. (Marigold Cultivation)
उमरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी यंदा तुरीसोबत झेंडूचे आंतरपीक घेऊन दुहेरी उत्पन्नाची वाट धरली आहे. गणेशोत्सव, नवरात्र आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांची मागणी वाढली असून ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.(Marigold Cultivation)
गणेशोत्सव, नवरात्र व दसरा यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने शेतकऱ्यांना यंदा चांगला दर मिळत आहे.(Marigold Cultivation)
उत्सवामुळे झेंडूला मागणी
गुजरातसह महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये झेंडू फुलांचा पुरवठा सुरू असून, सध्या दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलो इतका मिळतो आहे. गेल्या काही वर्षांत अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना फुले टाकून द्यावी लागली होती. त्यामुळे लागवडीचा उत्साह कमी झाला होता. मात्र, यंदा समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. (Marigold Cultivation)
आंतरपीकाचा लाभ
कोलविहीर येथील शेतकरी गजानन झुने यांनी जून-जुलै महिन्यात तुरीच्या पिकात झेंडूचे आंतरपीक घेतले. सध्या या झेंडूची तोडणी करून फुले गुजरात बाजारात विक्रीसाठी पाठविली जात आहेत. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांच्या हाती आले आहे.
पावसाचा फटका, तरीही दरात वाढ
गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे झेंडू उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाली आहे. मात्र, उत्पादन कमी झाल्याने बाजारात दर झपाट्याने वाढले असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
अकोट बाजारपेठ फुलली
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला अकोट शहरातील बाजारपेठ झेंडूच्या पिवळ्या व भगव्या फुलांनी बहरली होती. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी विविध भागांत स्टॉल लावून झेंडूची विक्री केली. या फुलांच्या सौंदर्यामुळे आणि चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.