Join us

Marathwada Rain Update : मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; खरीप पिकांचा चिखल वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:33 IST

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील शेतकरी सलग तीन महिन्यांच्या अतिवृष्टीने हवालदिल झाले आहेत. विभागातील तब्बल ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिके चिखलात मिळाली असून १५ लाख ७८ हजार शेतकरी संकटात सापडले आहेत. (Marathwada Rain Update)

विकास राऊत

 मराठवाड्यातील शेतकरी सलग तीन महिन्यांच्या अतिवृष्टीने हवालदिल झाले आहेत. विभागातील तब्बल ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिके चिखलात मिळाली असून १५ लाख ७८ हजार शेतकरी संकटात सापडले आहेत. (Marathwada Rain Update)

प्राथमिक अहवालानुसार, १२ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके संपुष्टात आली आहेत. सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून पंचनाम्यांना अजून गती मिळालेली नाही.(Marathwada Rain Update)

गेल्या तीन महिन्यांतील सलग अतिवृष्टीने मराठवाड्यातील खरीप हंगामावर मोठा घाला घातला आहे. विभागातील तब्बल ३ हजार ९२९ गावांतील पिकांचा चिखल झाला असून १५ लाख ७८ हजार ३३ शेतकऱ्यांचे उत्पन्न हातचे गेले आहे. (Marathwada Rain Update)

प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार आतापर्यंत १२ लाख ४६ हजार २४९ हेक्टर क्षेत्रावरील पिके संपुष्टात आली आहेत.(Marathwada Rain Update)

नांदेड सर्वाधिक नुकसानग्रस्त

नुकसानीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ लातूर, हिंगोली व धाराशिव जिल्ह्यांचा क्रम लागतो.

छ. संभाजीनगर : ५५ गावे, ४० हजार ६६६ शेतकरी

जालना : १८४ गावे, २७ हजार ६५९ शेतकरी

परभणी : ३१९ गावे, १ लाख ४३ हजार १३५ शेतकरी

हिंगोली : ७०३ गावे, १ लाख ७२ हजार ५७७ शेतकरी

नांदेड : १ हजार ३२६ गावे, ६ लाख ५५ हजार ४१५ शेतकरी

बीड : २०६ गावे, ४२ हजार ८९५ शेतकरी

लातूर : ७८२ गावे, ३ लाख ६४ हजार ५५१ शेतकरी

धाराशिव : ३६४ गावे, १ लाख ६७ हजार ७३५ शेतकरी

एकूण : ३ हजार ९२९ गावे, १५ लाख ७८ हजार ३३ शेतकरी प्रभावित

पंचनाम्यांना गती नाही

विभागातील ५ लाख ६२ हजार ७२७ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र अजून ७ लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे बाकी आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी यंत्रणेला वेगाने काम करण्याची मागणी होत आहे.

मालमत्तेचे व जनावरांचेही नुकसान

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचेच नव्हे तर नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

एकूण २ हजार ८९५ मालमत्तांचे नुकसान

६ मालमत्ता पुरात वाहून गेल्या

४१५ मालमत्ता अंशतः नुकसानग्रस्त

२ हजार ८२५ मालमत्तांची पडझड

७२ झोपड्या वाहून गेल्या

२५६ जनावरांचे गोठे पडले

१ हजार ४९ जनावरांचा मृत्यू

५० व्यक्तींना जीव गमवावा लागला

उत्पादन घटणार ५० टक्क्यांनी

मराठवाड्यातील एकूण ८ हजार ५५० गावांपैकी ४ हजार गावांत खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील उत्पादन ५० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. या उत्पादन घटामुळे पुढील काळात अन्नधान्य व डाळींच्या किमती वाढून महागाईचा तडाखा सर्वसामान्यांना बसण्याची भीती वर्तविली जात आहे.

मराठवाड्यातील शेतकरी सलग अतिवृष्टीने हवालदिल झाले आहेत. शेतकरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे व भरपाईची वाट पाहत आहेत, मात्र अद्याप प्रक्रियेला गती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शासनाने त्वरीत निर्णय घेऊन मदत कार्य सुरू करणे गरजेचे आहे, अशी मागणी वाढू लागली आहे.

हे ही वाचा सविस्तर : E-Pik Pahani : सीसीआय व नाफेड खरेदीसाठी डिजिटल नोंदणी बंधनकारक; कसा मिळणार योजनांचा लाभ?

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमराठवाडानांदेड