Join us

Marathwada Rain Update : मराठवाड्यात धो-धो पाऊस; हजारो एकर शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:43 IST

Marathwada Rain Update : मराठवाड्यावर पुन्हा एकदा संकटाचा डोंगर कोसळला आहे. आकाशातून बरसलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. पिकांचे नुकसान, घरांची पडझड, जनावरांचा बळी... आणि अश्रूंनी डोळे पाझरणारे शेतकरी. पावसाने दिलासा नाही तर विदारक वेदना दिल्यात. (Marathwada Rain Update)

Marathwada Rain Update : मराठवाड्यात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजविला आहे. नद्या-नाले तुडुंब भरले असून गावे जलमय झाली आहेत. नांदेड, बीड, हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांत जीवितहानी, जनावरे दगावणे आणि हजारो एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. (Marathwada Rain Update)

शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर कोसळला असून प्रशासनाकडून तातडीची मदत सुरू आहे. मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे. ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. (Marathwada Rain Update)

नांदेड जिल्ह्यात ३, बीडमध्ये १ व हिंगोलीत २ अशा एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शंभराहून अधिक जनावरे दगावली असून हजारो एकरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.(Marathwada Rain Update)

मागील २४ तासांत मराठवाड्यातील ५७ मंडळांत अतिवृष्टी झाली. चार दिवसांपासून पाऊस मराठवाड्चाला झोडपत असून, अनेक धरणे शंभर टक्के भरली असून, मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे.(Marathwada Rain Update)

अर्धापूर तालुक्यात पिकांचे अतोनात नुकसान

अर्धापूर, मालेगाव आणि दाभड या तीनही महसुली मंडळांमध्ये अतीवृष्टी झाली आहे.

अर्धापूर – ८३ मिमी

मालेगाव – ६८ मिमी

दाभड – ६६ मिमी

सततच्या पावसामुळे मुग, उडीद, सोयाबीन, तूर, कापूस, हळद यांसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावांतील शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी मोड फुटल्याने पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला अशी हतबलता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

शेतकरी भगवान इंगोले (मालेगाव) यांनी शासनाने पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी व यावर्षी लागू केलेला नवीन पीकविमा निकष मागील वर्षाप्रमाणे तीन ट्रिगरमध्ये करावा, अशी मागणी केली आहे.

नांदेड जिल्ह्यात हाहाकार

मुखेड तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर लेंडी नदीची पाणीपातळी तब्बल १८ फूटांनी वाढली.

रावणगाव, हासनाळ, भासवाडी व भिंगळी ही चार गावे पाण्याखाली गेली.

पुराच्या पाण्यात तीन महिलांचा मृत्यू झाला असून १० ते १२ नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ व सैन्यदलाला पाचारण करण्यात आले आहे.

हिंगोली, बीड व जालना जिल्ह्यांतील स्थिती

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह ३६ तासांनी मिळाला. दुसऱ्या घटनेत धबधब्यावर पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील लिंगी नदीवरील पुलावरून कार वाहून गेली. यात एका तरुणाचा मृत्यू, तर तिघांना ग्रामस्थांनी वाचविले.

जालना जिल्ह्यात पाच मंडळांत अतिवृष्टी, दुधना धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आले.

लातूर, परभणी व धाराशिव जिल्हे जलमय

लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातील बोरगाव व धडकनाळ गावे पुराच्या पाण्याने वेढली; ३३० नागरिकांचे स्थलांतर. ७० शेळ्या व १० जनावरे दगावली; दोन ट्रॅक्टर व एक पिकअप वाहन वाहून गेले.

परभणी जिल्ह्यात नद्या-नाले खळखळून वाहत असून वाहतूक ठप्प.

धाराशिव जिल्ह्यात चार तालुके पुराच्या पाण्याने वेढले तर मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.

भाविकांची थरारक सुटका

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील रुद्रेश्वर लेणी परिसरात आलेले १० भाविक अचानक आलेल्या पुरात अडकले. स्थानिक ग्रामस्थांनी धाडस दाखवत सर्वांची सुखरूप सुटका केली.

पावसामुळे १ लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे तर जानावरे दगावले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नुकसानभरपाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. घरांचे नुकसान झालेल्यांसाठी तात्पुरते निवारे, जेवण व स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ पंचनामे व मदतीची प्रक्रिया सुरू आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada Dam Water Storage : मराठवाड्यात पावसाची मेहरबानी; किती आहे जलसाठा उपलब्ध वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमराठवाडापाऊसनांदेडबीडजालनाशेतकरीशेती