- सुनील चरपे
आरोग्याबाबतची जागरूकता वाढत असल्याने सेंद्रिय शेतमालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, या शेतमालाची मागणी वाढत आहे. यातून बाजारात सेंद्रिय, नैसर्गिक, रसायनमुक्त असे शब्दप्रयोग असलेले फलक व लेबल बघायला मिळतात. मात्र, या शब्दांआड लपलेले सत्य सामान्य ग्राहकाला सहज कळत नाही.
भाजीपाला अथवा धान्य दिसायला ताजे, टवटवीत, हिरवेगार वाटत असले तरी हा शेतमाल सेंद्रिय असतोच, असे नाही. प्रत्यक्षात सेंद्रिय व रासायनिक शेतमालामधील फरक ओळखणे ग्राहकांसमोर मोठे आव्हान बनले आहे. केवळ नावावर किंवा विक्रेत्यांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोनातून चौकसपणे तपासणी करणे गरजेचे आहे. मग खरा सेंद्रिय शेतमाल ओळखायचा कसा?
सेंद्रिय शेती म्हणजे काय ?
सेंद्रिय शेतमालाच्या उत्पादनासाठी कुठल्याही प्रकारच्या रासायनिक घटकांचा वापर केला जात नाही. या पिकांची वाढ व उत्पादन हे मातीचे आरोग्य व हवामानाची अनुकूलता यावर अवलंबून असते.
या पिकांतील तण तसेच त्यावरील रोग व किडींच्या व्यवस्थापनासाठी रासायनिक खते, तणनाशके, कीटकनाशके, बुरशीनाशकांचा वापर केला जात नाही. या पिकांच्या उत्पादनासाठी शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीची खते व इतर सेंद्रिय पदार्थाचा वापर केला जातो.
या बाबी तपासून घ्या
सेंद्रिय शेतमाल खरेदी करण्यापूर्वी त्याला नॅशनल प्रोग्राम फॉर ऑरगॅनिक प्रॉडक्शन (एनपीओपी) किंवा पार्टीसिपटोरी गॅरंटी सिस्टिम (पीजीएस) चे प्रमाणपत्र आहे का? त्यावर या दोन्हीपैकी एका संस्थेचा लोगो, क्रमांक आहे का ते तपासून बघा. त्या शेतमालावर उत्पादकाचे नाव, पत्ता, त्याला सेंद्रियतेचे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेचे नाव व पत्ता तपासून बघा.
सेंद्रिय शेतमाल ओळखायचा कसा?
सेंद्रिय भाजीपाला व फळांचा आकार एकसारखा नसतो, तो लहान-मोठा असतो. रंग नैसर्गिक असतो व चमकदार नसतो. या शेतमालाचा गंध नैसर्गिक व थोडा जास्त तीव्र असतो. चव अधिक चविष्ट व नैसर्गिक असते. या शेतमालावर मातीचे अवशेष असू शकतात. तुलनेत रासायनिक घटकांचा वापर केलेल्या शेतमालाचा आकार व रंग एकसारखा, चमकदार व देखणा असतो.
सेंद्रिय भाजीपाला व फळे जास्त वेळ ताजी राहतात, पण पाण्यात जास्त वेळ विरघळत नाहीत. या पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जात नसल्याने हा शेतमाल कीड लागला किंवा त्यावर डाग असलेला दिसू शकतो. विक्रेत्याला तो ज्या शेतकऱ्याकडून सेंद्रिय शेतमाल खरेदी करतो, तो शेतकरी पिकांच्या उत्पादनासाठी कोणत्या कृषी निविष्ठांचा वापर करतो, याची व त्याच्या शेती करण्याच्या पद्धतीची विचारणा करा.
