Join us

भाजीपाला पिकांवर 'पावडरी मिलड्यू' रोगाचे थैमान, असं करा व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 12:39 IST

सध्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर 'पावडरी मिल्ड्यू' भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

खामगाव : सध्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर 'पावडरी मिल्ड्यू' भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे पानगळ होत असून, लाखो रुपये खर्चुन पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

खामगाव तालुक्यात रब्बी हंगामात ३३ हजार ८४८ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कांद्याची ३६८३ तर भाजीपाल्याची ११२६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. रात्री उच्च सापेक्ष आर्द्रता व दिवसा कमी सापेक्ष आर्द्रता तसेच २२ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमान असे पोषक वातावरण असल्याने या रोगाचा प्रसार वाढला आहे. यामुळे झाडांची पानगळ होत आहे. झाडांची संपूर्ण पाने गळून पडत असून, झाडे सुकत आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शेतकरी फवारणी करीत आहेत.

पिकांवर सध्या भुरी रोग आला आहे. या रोगामुळे पानगळ होत आहे. फवारणी केल्यावरही झाडांची पाने गळून पडत आहे. शेंड्यापर्यंत झाडांची पाने गळून पडत असून केवळ खोडच शिल्लक राहत आहे. त्यामुळे झाडे सुकत असल्याचे शेतकरी दीपक हागे यांनी सांगितले.

रोगाची लक्षणे काय आहेत?

या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर मिरचीच्या पानांच्या वरच्या बाजूस पिवळसर डाग पडतात. रोगाच्या नंतरच्या काळात पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी पांढरी बुरशी वाढते व नंतर पृष्ठभागावर पसरल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊन पाने व फुले गळून पडतात. लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांनी लाखो रूपयांची बियाणे, खते व किटकनाशके खरेदी केली. मात्र भुरी रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

काय काळजी घ्यावी...

झाडांचे नियमित निरीक्षण केल्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव निदर्शनास आल्यावर सल्फर ८० टक्के डब्ल्यू पी २५ ग्रॅम किंवा अझोक्सा ट्रोबिन २३ एस. सी. १० मिली संयुक्त बुरशीनाशके जसे अॅझओक्सास्ट्रोबिन ११ टक्के अधिक टेबूकोनाझोटल १८.३ टक्के एस बी@ १० मिली किंवा टेब्यूकोनाझोल १८.३ टक्के अधिक सल्फर ६५ टक्के डब्ल्यूजी २५ ग्रॅम याची प्रति १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी, असा सल्ला जळगाव जमोद येथील कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ञ अनिल गाभणे यांनी दिला आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीभाज्यापीक व्यवस्थापन