Maize Cultivation : यंदा बुलढाणा जिल्ह्यात मका पिकाची लागवड सरासरीच्या दुपटीने झाली असून शेतकऱ्यांनी या पिकाला मोठा प्रतिसाद दिला आहे. मात्र, या आशादायक स्थितीला आता लष्करी अळीचा धोका संभवतो आहे. (Maize Cultivation)
कृषी विभाग सतर्क झाला असून शेतकऱ्यांनीही सावध राहण्याची गरज आहे. आता या संकटावर वेळीच उपाय करणे गरजेचे ठरत आहे.(Maize Cultivation)
बुलढाणा जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात मका पिकाच्या लागवडीमध्ये विक्रमी वाढ झाली असून, कृषी विभागालाही ही आकडेवारी चकित करणारी वाटत आहे. (Maize Cultivation)
सरासरी लागवड क्षेत्र २३ हजार ९९५ हेक्टर असताना यंदा तब्बल ४९ हजार ५१२ हेक्टरवर मका पेरणी झाली आहे. हे प्रमाण सरासरीच्या २००.६ टक्के इतकं असून, जिल्ह्यातील मका हे चौथ्या क्रमांकाचं प्रमुख पीक ठरले आहे.(Maize Cultivation)
जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून मका पिकाच्या लागवड क्षेत्रात घट झाली होती. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात यामध्ये मोठा बदल दिसून आला आहे. (Maize Cultivation)
मका पिकाच्या काढणीनंतर जनावरांसाठी चाराही उपलब्ध होत असल्याने ज्वारी पिकाला पर्याय म्हणून या पिकाकडे पाहिल्या जात आहे. यामुळेच यावर्षी या पिकाच्या लागवड क्षेत्रात विक्रमी वाढ झाली आहे. (Maize Cultivation)
लष्करी अळीचं धोकादायक आक्रमण
मक्याच्या वाढत्या लागवडीबरोबरच आता शेतकऱ्यांसमोर लष्करी अळीचं संकटही गडद होत चाललं आहे. लष्करी अळी (Fall Armyworm) ही अतिशय वेगाने फैलावणारी आणि अत्यंत हानीकारक कीड आहे. ही अळी प्रामुख्याने मका पिकावर आक्रमण करते, पण तांदूळ, सोयाबीन, ऊस, कांदा, ज्वारी, गहू अशा ८० हून अधिक पिकांवर परिणाम करू शकते.
या अळीमुळे कणीस तयार होण्याआधीच झाडे नष्ट होतात, परिणामी मका उत्पादनात ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा धोका आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना नियमित निरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पिकांची लागवड (हेक्टरमध्ये)
पीक | लागवड क्षेत्र (हे.) |
---|---|
सोयाबीन | ४,१८,७७४ |
कपाशी | १,२७,५९० |
तूर | ८९,६२७ |
मका | ४९,५१२ |
लष्करी अळी नियंत्रणासाठी उपाय
रासायनिक फवारणी
स्पायनेटोराम ११.७% SC – ८ मिली / १० लिटर पाणी
थायोमेथॉक्झाम + लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन २.५% ZC – १० मिली / १० लिटर पाणी (संध्याकाळी फवारणी करावी)
सेंद्रिय उपाय
५% नीम अर्क किंवा निंबोळी अर्काची फवारणी
फवारणीनंतर १० दिवस मका जनावरांना चारा म्हणून देऊ नये
कृषी विभागाचा सल्ला
शेतकऱ्यांनी दर ५ ते ७ दिवसांनी पिकांचे बारकाईने निरीक्षण करावे. अळीच्या प्रारंभिक टप्प्यात योग्य नियंत्रण केल्यास मोठं नुकसान टाळता येतं. - मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा.
यंदा जिल्ह्यातील मका लागवडीतील वाढ ही सकारात्मक बाब असली, तरी लष्करी अळीचं संकट शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. वेळेवर उपाययोजना आणि सतर्कता राखल्यास पिकाचं नुकसान कमी करता येईल.