- दिगांबर जवादे
गडचिरोली : जिल्ह्याचा कल्पवृक्ष म्हणून ओळख असलेल्या मोहाच्या झाडाचा (Moh Fule) प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे. त्यात मोहफुलांचे विशेष महत्त्व आहे. सध्या वाळलेल्या मोहफुलांना सुमारे ५० ते ६० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. हा भात धानाच्या भावाच्या दुप्पट आहे. त्यामुळे नागरिक वाघाची दहशत असतानाही मोहफूल (Moh Ful) वेचण्यास शेतात व जंगलात जात आहेत.
जिल्ह्यातील जंगलात तसेच शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात मोहाची झाडे (Mahua Tree) आहेत. मोहाच्या झाडाच्या पानांपासून पत्रावली तयार केल्या जातात. त्याचे सणांच्या कालावधीत विशेष महत्त्त आहे. मोहाचे फळ म्हणजे टोळी होत. या टोळींपासून तेल तयार केले जाते. या तेलात मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असल्याने या टोळींची जवळपास ४० रुपये किलो दराने खरेदी केली जाते.
मोहफुलांपासून विविध पदार्थ तयार केले जात असल्याने मोहफुलांनाही प्रति किलो ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी इतर सर्व कामे सोडून मोहफुले वेचण्यासाठी जात आहेत. कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य मोहफुले वेचण्याच्या कामात व्यस्त आहेत. सकाळी १० वाजेपर्यंत मोहफुले वेचल्यानंतर ती घरी आणली जातात, ती काही दिवस वाळण्यासाठी ठेवली जातात. त्यानंतर त्यांची विक्री होते.
दीड महिना मिळतो रोजगार
मोहफुले संकलनाच्या माध्यमातून झाड मालकांना जवळपास दीड महिन्यांचा रोजगार मिळतो. एक एकरातील धानाएवढे उत्पन्न एक मोहाचे झाड देते. त्यामुळे सर्व कामे सोडून नागरिक मोहफुलांचे संकलन करीत असतात. यातून जवळपास दीड महिन्यांचा रोजगार मिळतो. वर्षभर कुठेही गेले तरी मोहफुलांच्या कालावधीत मात्र, शेतकरी कुटुंब हमखास घरी राहते. काही झाड मालक अर्था वाटा मोह वेचणाऱ्याला देत असतात.
एका झाडापासून १० हजारांचे उत्पन्न
जेवढे मोठे झाड तेवढी मोहफुले अधिक प्रमाणात पडतात, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मोहफुले पडण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडद्यापर्यंत मोहफुले पडतात. या कालावधीत एका झाडापासून दरदिवशी वाळलेले जवळपास १० किलो मोह मिळतात. त्यांची किंमत ५०० रुपये आहे. महिना ते दीड महिन्यांच्या कालावधीत जवळपास १० हजार रुपयांची मोहफुले मिळतात.
दारूसाठी मोहफुले बदनाम
मोहफुलांमध्ये अनेक पौष्टिक तत्त्व असतात. तसेच मोहफुलांपासून विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार केले जातात. दुर्गम भागात तर थेट भाजलेली मोहफुले खाल्ली जातात, मात्र याचे प्रमाण अतिशय कमी आहे. मोहफुलांपासून जास्तीत जास्त प्रमाणात दारू काढली जाते. त्यासाठीच मोहफुलांची सर्वाधिक खरेदी होते है कटू सत्य आहे. शेतकऱ्याला बन्यापैकी उत्पन्न मिळवून देणारी मोहफुले दारूसाठी बदनाम आहेत.
Unhali Tomato : उन्हाळी टोमॅटोसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे व्यवस्थापन कसे करावे?