संतोष येलकर
राज्यात वाढत्या सेंद्रिय शेतीच्या मागणीचा विचार करून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) आता प्रमाणित सेंद्रिय बियाण्यांच्या पुरवठ्यात 'एन्ट्री' करणार आहे. (Mahabeej Organic Seeds)
पुढील हंगामात शेतकऱ्यांना पारंपरिक आणि मसालावर्गीय पिकांच्या प्रमाणित सेंद्रिय बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक बुवनेश्वरी एस. यांनी दिली.(Mahabeej Organic Seeds)
सेंद्रिय बियाण्यांच्या पुरवठ्यासाठी महाबीजची मोठी तयारी
राज्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य, प्रमाणित आणि खात्रीशीर बियाणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाबीजने यावर्षीच प्रायोगिक तत्त्वावर सेंद्रिय बियाण्यांची बीजोत्पादन मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील निवडलेल्या शेतकऱ्यांकडून सेंद्रिय पद्धतीने बीजोत्पादन करण्यात येत आहे.
हरभरा, गहू, काळे जिरे, सोप (डिल सीड), ओवा, मेथी, कांदा बियाणे पहिल्या टप्प्यात या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
सेंद्रिय व पारंपरिक मसालावर्गीय पिकांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. महाबीजकडून यासाठी पुढाकार घेतला आहे.-बुवनेश्वरी एस.,व्यवस्थापकीय संचालक, महाबीज
शेतकऱ्यांना सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
सेंद्रिय बियाण्यांच्या पुरवठ्याबरोबरच महाबीज शेतकऱ्यांना त्यांच्या सेंद्रिय शेतीमालाला योग्य दर मिळावा यासाठी मार्केट उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करत आहे.
या संदर्भात महाबीज लवकरच राज्यातील सर्व जिल्हा कृषी अधीक्षकांची बैठक घेणार आहे.
यात पुढील वर्षीच्या हंगामातील सेंद्रिय बियाणे पुरवठा
नवीन पिकांच्या संभाव्य मागणीचे विश्लेषण
मार्केट उपलब्धता
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
तसेच, पुढील वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना चिया बियाणे उपलब्ध करून देण्याचाही महाबीजकडून प्रयत्न सुरू आहे, असेही बुवनेश्वरी यांनी स्पष्ट केले.
चार जिल्ह्यांत प्रायोगिक सेंद्रिय बीजोत्पादन
महाबीजकडून यंदाच्या रब्बी हंगामात अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये सेंद्रिय बीजोत्पादनाचा प्रायोगिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
बीजोत्पादनाचे तपशील
| पीक | क्षेत्र (हे.) |
|---|---|
| गहू | ३० हेक्टर |
| हरभरा | ६५ हेक्टर |
| काळे जिरे | ३ हेक्टर |
| सोप | २ हेक्टर |
| ओवा | १ हेक्टर |
| कांदा बियाणे | १.६० हेक्टर |
या उत्पादनातून पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर राज्यातील शेतकऱ्यांना प्रमाणित सेंद्रिय बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी लाभ
सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित, दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता
मसालावर्गीय व पारंपरिक पिकांमधून जास्त उत्पन्नाची अपेक्षा
महाबीजमार्फत बाजारपेठ उपलब्ध होण्याची शक्यता
सेंद्रिय उत्पादनांना प्रीमियम दर मिळण्याची संधी
महाबीजचा सेंद्रिय क्रांतीकडे प्रवास
राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना, शेतकऱ्यांना विश्वसनीय सेंद्रिय बियाणे पुरवणारी शासन संस्था पुढे येणे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आगामी रब्बी हंगामात महाबीजचा हा उपक्रम राज्यातील सेंद्रिय उत्पादन क्षेत्राला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
