Mahabeej Cotton Seeds : शेतीतील नवनवीन प्रयोग आणि विज्ञानाधारित संशोधनाच्या जोरावर आता कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.
अकोला जिल्ह्यातील पैलपाडा येथे राज्य बियाणे महामंडळाच्या संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेले 'महाबीटी बीजी-२' हे नवीन बीटी संकरित कापूस वाण आता शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल झाले आहे. उत्पादनक्षम आणि हवामान बदलांना तोंड देणारे हे वाण शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. (Mahabeej Cotton Seeds)
पैलपाडा येथील राज्य बियाणे महामंडळाच्या संशोधन केंद्रात आणि 'सेंटर ऑफ एक्सलन्स' मध्ये विकसित करण्यात आलेल्या 'महाबीटी बीजी-२' या नवीन संकरित बीटी कापूस वाणाचे शनिवारी अधिकृतपणे अनावरण करण्यात आले. (Mahabeej Cotton Seeds)
'महाबीज-१२४' या नावाने या वाणाचे विपणन करण्यात येणार असून, हे वाण विशेषतः कोरडवाहू भागांतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे, असा विश्वास महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी व्यक्त केला. (Mahabeej Cotton Seeds)
उत्पादनक्षम, कोरडवाहू भागासाठी उपयुक्त
कापसाच्या पारंपरिक वाणांपेक्षा हे वाण उच्च उत्पादनक्षम असून, कोरडवाहू भागांमध्ये कमी पावसातही अधिक उत्पन्न देण्याची क्षमता बाळगते. त्यामुळे सध्या हवामानातील अनिश्चिततेचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना हे वाण फारच उपयोगी ठरणार आहे.
संशोधित तूर वाणही उपलब्ध
या कार्यक्रमात कापासाचे 'महाबीटी बीजी-२' व्यतिरिक्त संशोधित तूर वाण 'एमपीव्ही-१०६' देखील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली. या वाणास देशाच्या इतर राज्यांतूनही मागणी वाढत असून, विशेषतः तामिळनाडू व कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लवकरच त्या भागांमध्ये या वाणांचा पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
शाश्वत शेतीसाठी सातत्याने संशोधन
* डॉ. रणजीत सपकाळ (महाव्यवस्थापक) आणि विजय देशमुख यांनी यावेळी सांगितले की, राज्याच्या विविध भागांतील हवामान, माती, सिंचन व्यवस्था आणि पीक पद्धती लक्षात घेऊनच बियाण्याचे संशोधन व उत्पादन केले जाते. केवळ कापूसच नव्हे, तर इतर पिकांसाठीही अशीच प्रक्रिया सातत्याने राबवली जात आहे.
* नवीन वाण खरेदीसाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या महाबीज विक्री केंद्राशी संपर्क साधावा. या नव्या वाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढीसोबतच आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे.