Lemon Farmers Crisis : लिंबू उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामानातील अनिश्चितता, रोगराई आणि बाजारभावातील घसरण यामुळे लिंबूचे दर प्रति किलो फक्त २ ते ३ रुपये इतके कोसळले आहेत. (Lemon Farmers Crisis)
लाखो रुपयांचा खर्च करूनही उत्पन्न शून्याच्या जवळ गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागा मोडण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून आधारभूत दर न मिळाल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत आले आहेत.(Lemon Farmers Crisis)
खामगाव परिसरात मोठ्या प्रमाणात लिंबू उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा हवामानातील अनिश्चितता, रोगराई आणि अवकाळी पावसामुळे लिंबू उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.(Lemon Farmers Crisis)
साधारणपणे उन्हाळ्यात लिंबाचे दर प्रति किलो ७ ते १० रुपये असतात. पावसाळ्यात दर काहीसे घसरतात, परंतु यंदा दर कोसळून केवळ २ ते ३ रुपये प्रति किलो इतका नीचांक गाठला आहे. व्यापारी या दराने खरेदी करत असल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
उत्पादन खर्च वाढला, पण उत्पन्न शून्य
लिंबू उत्पादनासाठी शेतकऱ्यांना छाटणी, फवारणी, खत, मजुरी आणि वाहतूक अशा अनेक खर्चांचा सामना करावा लागतो. मात्र, बाजारभाव कोसळल्याने लाखो रुपयांची गुंतवणूक वाया जात आहे. शेतकरी सांगतात की, शासनाने लिंबूला किमान आधारभूत दर (MSP) द्यावा, अन्यथा बागा तोडून टाकण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे बागा तोडण्याची वेळ आली आहे.- शिवराम टाले, काळेगाव
लाखो रुपये खर्च करूनही उत्पन्न शून्य आहे. शासनाने तातडीने आधारभूत दर जाहीर करावा.- जनार्दन शेगोकार, कंझारा
बागा मोडण्यास शेतकऱ्यांचा निर्णय
काही भागात शेतकऱ्यांनी दरातील घसरणीमुळे अक्षरशः हात टेकले आहेत. अनेकांनी लिंबूच्या बागा मोडण्यास सुरुवात केली आहे. हवामानातील अस्थिरता, अवेळी पाऊस, कीडरोग आणि शासनाचा आधारभाव नसल्यामुळे हा तोट्याचा व्यवसाय ठरत आहे.
शेतकरी संघटनांनी शासनाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे, अन्यथा आगामी हंगामात लिंबू उत्पादनात मोठी घट होईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाही.
हे ही वाचा सविस्तर : Tomato Market : पावसाने टोमॅटोची 'लाली' फिकी; भाव घसरले अर्ध्यावर!
