गडचिरोली : शेतजमिनीवर नाव चढविणे, कमी करणे, फेरफार करणे ही अतिशय क्लिष्ट प्रक्रिया मानली जाते. पण आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलद गतीने अशा प्रकियेचा निपटारा करण्यासाठी प्रत्यक्ष भूमी उपअधीक्षक कार्यालयात फेरफारप्रकरणी लोकअदालतीचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा व तालुकास्तरावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात लोकअदालती होणार आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षकांनी यासदंर्भात जिल्हयातील संपूर्ण उपअधीक्षकांना पत्र देत सदर मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लोकअदालतीची तयारी भूमी अभिलेख विभागाने सुरू केली आहे.
जमिनीचे कागदपत्र जमा करणे, नाव कमी करणे, चढवणे, यासोबतच महास्वामित्व योजनेतंर्गत ड्रोन सर्व्हे झालेल्या गावातील अखिवपत्रिकेतील नावातील नोंद दुरुस्ती, नोंदणी आदी कामेही केली जाणार आहेत. या लोकअदालतीमुळे शेतीसंदर्भातील कामाचा बहुतांश वेळ शेतकऱ्यांचा वाचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपअधीक्षक कार्यालयात जाऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भूमी अभिलेख विभागाने केले आहे.
सेवा पंधरवड्यातील कार्यक्रम
- १६ सप्टेंबर : महसुली अपिलीबाबत जिल्हास्तरावर लोकअदालत
- १७ व २४ सप्टेंबर: फेरफार अदालत
- १८ व २५ सप्टेंबर: सनद वाटप शिबिर
- १९, २० व २१ सप्टेंबर : अतिक्रमण /शिवपाणंद रस्ते हद्द सीमांकन
- २३ सप्टेंबर : मोजणी तक्रारीबाबत लोकअदालत
- २६ सप्टेंबर : स्वामीत्वबाबत तक्रारी निवारण.
भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने भू-प्रणाम केंद्र उपअधीक्षक भूमी अभिलेख कोषागार कार्यालयाजवळ, गडचिरोली येथे लोकअदालत व सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी जमिनीबाबतच्या अडचणी मांडाव्यात.
- विजय भालेराव, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख गडचिरोली.