शिवानंद घुगे
ग्रामीण भागात गुढीपाडव्यापासून नव्या शेती वर्षाची सुरुवात होत असताना सालगडी (गडी) शोधण्याची लगबग वाढली आहे.
मात्र यंदा सालगड्यांच्या वाढलेल्या पॅकेजमुळे आणि बदललेल्या अटींमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाढत्या मजुरी, निसर्गाची अवकृपा आणि शेतीतील अनिश्चित उत्पन्न यामुळे अनेक शेतकरी आता जमीन बटाईने किंवा ठोक्याने देण्याकडे वळत असल्याचे चित्र आहे.
सालगड्यांचे वाढलेले पॅकेज; शेतकऱ्यांना झटका
यंदा सालगडी वर्षाकाठी १ लाख ३० हजार रुपयांपासून पुढे मानधनाची मागणी करत आहेत. केवळ रोख रक्कमच नव्हे, तर वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य, तसेच सण-समारंभ किंवा अडचणीच्या काळात अतिरिक्त आर्थिक मदतीची अटही घालण्यात येत आहे. यामुळे मोठ्या जमीनधारकांनाही सालगडी ठेवणे कठीण होत आहे.
शेती बटाईकडे वाढता कल
मजुरीचा खर्च वाढल्यामुळे आणि शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी स्वतः शेती करण्याऐवजी जमीन दुसऱ्याला कसण्यासाठी देण्याचा पर्याय स्वीकारला आहे.
बटाई पद्धत (उत्पन्न वाटणी)
ठोका पद्धत (ठराविक रक्कम)
या दोन्ही पर्यायांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. पडीक ठेवण्यापेक्षा काहीतरी उत्पन्न मिळावे, यासाठी हा मार्ग स्वीकारला जात आहे.
यांत्रिकीकरण आणि मजूर टंचाई
ग्रामीण भागात शेतीत यांत्रिकीकरण वाढत असले तरी मजूर वर्ग कमी होत आहे. शहरांकडे स्थलांतर, इतर रोजगाराच्या संधी आणि वाढती महागाई यामुळे शेतीकामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. परिणामी सालगड्यांचे महत्त्व वाढले असून त्यांची मागणीही वाढली आहे.
सालगड्यांच्या 'हायटेक' अटी
आजचा सालगडी पारंपरिक राहिला नसून अधिक व्यावसायिक झाला आहे.
ठराविक कामाचे तास
वेळेवर काम सुरू आणि समाप्ती
सोलर पंप असलेल्या शेतांना प्राधान्य
चांगल्या सुविधा आणि राहण्याची व्यवस्था
या अटींमुळे शेतकऱ्यांसाठी त्यांना सांभाळणे अधिक खर्चिक ठरत आहे.
महागाई वाढली आहे. त्यामुळे वर्षाचे चांगले पॅकेज आणि अन्नधान्य मिळेल, तिथेच काम करणार.- भागवत टाकळकर, शेतमजूर
शंभर एकर जमीन असूनही सालगडी परवडत नाही. त्यामुळे बहुतांश शेती बटाईने दिली आहे. फक्त शेणखतासाठी एक गडी ठेवला आहे.- रमेश वाघ, शेतकरी
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नव्या शेती वर्षाची सुरुवात होत असली तरी वाढते खर्च, मजूर टंचाई आणि बदलती परिस्थिती यामुळे शेतीचे पारंपरिक गणित बदलत आहे.
सालगड्यांचे वाढलेले पॅकेज आणि अटी लक्षात घेता, शेतकऱ्यांचा कल बटाई आणि ठोका पद्धतीकडे वळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भविष्यात शेती व्यवस्थापनात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
