Lakhpati Didi Yojana : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि उद्योजक बनविण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'उमेद' योजनेने नागपूर जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे.(Lakhpati Didi Yojana)
आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल १ लाख ७० हजार महिलांनी 'लखपती दीदी' म्हणून नवा आर्थिक टप्पा गाठला आहे.(Lakhpati Didi Yojana)
राज्यात एक कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून, त्या दिशेने नागपूर जिल्हा आघाडीवर आहे.(Lakhpati Didi Yojana)
काय आहे उमेद अभियान?
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
स्वयं सहाय्यता समूहांच्या माध्यमातून महिलांमध्ये बचतीची सवय, आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास, उद्योजकता आणि शाश्वत उपजीविकेचे साधन निर्माण केले जात आहे.
नागपूर जिल्ह्याचा प्रगतीचा आलेख पाहता, राज्यातील पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये नागपूरचा समावेश होतो. जिल्ह्यात आतापर्यंत १९,६६२ स्वयं सहाय्यता समूहांची स्थापना झाली असून, त्यामध्ये जवळपास २ लाख महिलांचा सहभाग आहे. तसेच १,०२२ ग्रामसंघ आणि ५८ प्रभाग संघ कार्यरत आहेत.
तालुकानिहाय लखपती दीदींची कामगिरी
नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये उमेद अभियान प्रभावीपणे राबविले जात असून अनेक तालुक्यांनी उद्दिष्टाच्या जवळपास किंवा अधिक कामगिरी केली आहे.
भिवापूर, हिंगणा, कळमेश्वर, कामठी, काटोल, कुही, मौदा, नागपूर ग्रामीण, नरखेड, पारशिवनी, रामटेक आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर महिलांनी लखपती दीदीचा दर्जा प्राप्त केला आहे. विशेषतः नरखेड आणि नागपूर ग्रामीण तालुक्यांत लखपती दीदींची संख्या लक्षणीय आहे.
'लखपती दीदी' योजना म्हणजे काय?
उमेद अभियानांतर्गत महिलांना कायमस्वरूपी आणि शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
महिलांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उभारण्यास प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात मोठा आर्थिक बदल घडून येत आहे.
स्वयं सहाय्यता समूहांच्या माध्यमातून महिलांचे स्वावलंबन, आर्थिक साक्षरता आणि कौशल्य विकास घडवून आणले जात आहे. उद्योग उभारून महिलांना लखपती बनविणे, त्यांचे सशक्तीकरण करणे आणि शाश्वत उत्पन्ननिर्मिती करणे हेच उमेद अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. -विनायक महामुनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
कोणते व्यवसाय महिलांनी उभारले?
उमेद अभियानांतर्गत महिलांनी शेती व शेतीपूरक तसेच बिगर शेती व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे.
शेती व शेतीपूरक व्यवसाय
शेळी पालन, गाय व म्हशी पालन, एकत्रित शेती, मत्स्य व्यवसाय, मत्स्य बीज उत्पादन केंद्र, धान्य व दूध संकलन केंद्र, क्लिनिंग व ग्रेडिंग सेंटर, फुलशेती, कीड नर्सरी आदी.
बिगर शेती आधारित उद्योग
ज्वेलरी निर्मिती, मसाले उत्पादन, ड्रेस, बेडशीट व पिलो कव्हर तयार करणे, जेन्ट्स शर्ट शिवणकाम, गूळ व शहद उत्पादन, कच्ची घाणी तेल निर्मिती, चॉकलेट, मशरूम, बांगड्या, खेळणी, अगरबत्ती, केक, प्रीमिक्स निर्मिती आदी उद्योग महिलांनी यशस्वीपणे उभारले आहेत.
२०२४-२५ चे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नागपूर जिल्ह्याला ९९,४८६ लखपती दीदींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्याने प्रत्यक्षात ९९,५०० महिला लखपती दीदी बनवून १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.
सद्याच्या आर्थिक वर्षातही ७७,४३८ महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, जवळपास ७७ हजार महिलांचे लक्ष्य पूर्ण झाले आहे.
३०१ कोटींचे बँक कर्जवाटप
या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ८,०४२ स्वयं सहाय्यता समूहांना ३०१ कोटी ४२ लाख रुपयांचे बँक कर्ज वितरित करण्यात आले आहे. या भांडवलातून महिलांनी विविध उद्योग सुरू करून उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले आहेत.
योजनेचा लाभ कसा घ्यायचा?
ग्रामीण भागातील महिलांनी उमेद अभियानांतर्गत स्थापन केलेल्या स्वयं सहाय्यता समूहाच्या सदस्य असणे आवश्यक आहे.
जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तसेच समुदाय संसाधन व्यक्ती यांच्या माध्यमातून महिलांना विविध शासकीय योजनांचा आणि उमेद अभियानाचा लाभ मिळू शकतो.
