Khat Darvadha : मराठवाड्यातील शेतकरी एकीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीतून सावरत असतानाच आता खत दरवाढीच्या निर्णयामुळे पुन्हा चिंतेत सापडले आहेत. (Khat Darvadha)
खरीप हंगामात लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, भरपाईची घोषणा शासनाकडून झाली असली तरी ती अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेली नाही. (Khat Darvadha)
आणि अशा परिस्थितीत खत कंपन्यांनी रब्बी हंगामाच्या तोंडावर खत दरवाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे चित्र दिसत आहे. (Khat Darvadha)
अतिवृष्टीचा फटका आणि नव्या संकटाची चाहूल
सप्टेंबर महिन्यात मराठवाडा विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके आडवी झाली, तर काही भागात पाण्याखाली गेली.
महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असतानाच पुन्हा अधूनमधून पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढवली आहे. खरीप हंगाम गेला आणि आता रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज, बी-बियाणे आणि खत यांचा मोठा खर्च करावा लागणार आहे.
खत दरवाढीने शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट
अशा वेळी खत कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणखी वाढला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सुमारे २५ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली जाते.
आरसीएफ कंपनीने २०-२०-०-१३ या खताच्या प्रति गोणी दरात १०० रुपयांची वाढ करून दर १५०० रुपये केला आहे. तर १६-१६-१६ खताचा दर १६५० वरून १६७५ रुपये करण्यात आला आहे.
कोरोमंडल कंपनीनेही प्रति गोणी ५० रुपयांनी दरवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय चम्बल फर्टिलायझर्स, झुआरी फर्टिलायझर्स या कंपन्यांनीही खत दरवाढीचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, अधिकृत घोषणेसाठी अजून प्रतीक्षा आहे.
महाधन कंपनीने जाहीर केलेले नवे दर
| खताचे नाव | जुने दर (₹) | नवे दर (₹) |
|---|---|---|
| २४:२४:०० | १८५० | १९०० |
| २०:२०:१३ | १४५० | १५०० |
| ९:२४:२४ | १९०० | २१०० |
| ८:२१:२१ | १८०० | १९७५ |
| ११:३०:१४ | १८०० | १९७५ |
| १०:२६:२६ | १९५० | २१०० |
| एमओपी | १८०० | १८०० |
शेतकरी संघटनांचा इशारा
शेतकरी संघटनांनी या दरवाढीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही दरवाढ तात्काळ मागे घेतली नाही, तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी मोठ्या संकटात आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक नाही. अशा वेळी खत दरवाढ अन्यायकारक आणि निंदनीय आहे. ही दरवाढ तात्काळ मागे घेतली नाही, तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.- पंढरीनाथ गोडसे, संस्थापक अध्यक्ष, संघर्ष शेतकरी संघटना
रब्बी हंगामाच्या सुरुवातीला खत दरवाढ हा शेतकऱ्यांसाठी आणखी एक धक्का ठरत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून खत कंपन्यांना दरवाढ मागे घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी वाढू लागली आहे.
अन्यथा अतिवृष्टीच्या जखमा अजून भरायच्या असतानाच या दरवाढीने शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
