नाशिक : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात पीक पॅटर्न बदलला असून, आंबा, मका पिकांची लागवड वाढली आहे. कांदा अन् द्राक्षाचा पट्टा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पीक पद्धतीत वेळेनुसार बदल करीत आहेत. मात्र, ज्वारीचा पेरा मागे पडला आहे. दोन वर्षापूर्वीच्या रब्बी व खरीप हंगामात ज्वारीने शेतशिवार वाढले होते.
आताच्या खरीप हंगामात ज्वारीचे सरासरी क्षेत्र (लागवडीचा अंदाज) केवळ ९३६ हेक्टर इतके असल्याने ज्वारीचे दर ४५ रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. शहरी भागातही ज्वारीला आरोग्यदृष्ट्या मागणी तिपटीने वाढली असून, लहान दुकानांपासून मोठमोठ्या मॉलमध्येदेखील निवडलेली ज्वारी मिळू लागली आहे.
खरीप हंगामाच्या लागवडीचा काळ संपत आला असताना ९३६ पैकी फक्त ३८२ हेक्टर इतकीच लागवड २२ जुलैअखेर झाली आहे. त्यामुळे ज्वारीची कोठारे यावेळेस रिकामीच राहतील.
पारंपरिक पिकांकडे दुर्लक्ष
ज्वारी आणि बाजरी यांचा पेरा कमी झाल्यामुळे उत्पादनात घट होईल. हवामान बदल, पाण्याची कमतरता, आधुनिक पिकांचे आकर्षण यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. परिणामी, उत्पन्नात घट होऊन त्याचा परिणाम थेट या पिकांच्या भावावर होण्याची शक्यता आहे.
भुईमुगाचा पेरा समाधानकारक
झटपट पैसा देणारे पीक म्हणून भुईमूग या पिकाकडे पाहिले जाते. एकूण २४१२७ हेक्टरवर भुईमुगाची लागवड होत असून २२ जुलैअखेर ५६.५ टक्के लागवड पूर्ण झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भुईमूगदेखील नाशिकच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येत असते.
१२ तालुक्यांत ज्वारी शून्य टक्का
कळवण, देवळा, सुरगाणा, नाशिक, त्र्यबंकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, पेठ, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड या १२ तालुक्यांमध्ये ज्वारीची लागवड शून्य टक्का असून, सात तालुक्यांमध्ये बाजरीची लागवड नाही. मालेगाव, बागलाण व नांदगाव तालुक्यातच ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. पावसाची अनियमितता आणि त्यामुळे सातत्याने ज्यारी आणि बाजरीच्या उत्पन्नात घट होत आहे.
खरिपाचा पॅटर्न बदलला
खरीप हंगामात ज्वारीचे लागवड क्षेत्र घटले असले, तरी बाजरीची लागवड ८० हजार २१५ हेक्टरवर होईल. तर मका तब्बल २ लाख ३६ हजार २३९ हेक्टर, सोयाबीन ९९ हजार ९४१ हेक्टरवर करण्यात येत आहे.
पैसे देणारे ऊसही कमीच
महाराष्ट्रात ऊस हे एक महत्त्वाचे पीक आहे आणि चांगले उत्पन्न देते. याशिवाय जवस व कपाशीदेखील पैसे मिळवून देणारे पीक आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात कापूस पीक फक्त ३९ हजार हेक्टरवर तर ऊस फक्त १४ हजार ३१९ हेक्टरवर लागवड होत आहे.
ज्वारीला पर्याय काय ?
ज्वारीतून अधिकचे उत्पन्न नाही तर अधिकचे कष्टच आहेत, हे लक्षात आल्यानंतर शेतकरी कडधान्य पिकांकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यामुळे खरीपा हंगामातही सोयाबीन, करडई, नाचणी, मका, कडधान्य या पिकांचा पेरा अधिक झाला आहे.
नाशिक जिल्ह्यांत कांद्यापेक्षा 'या' पिकाची सर्वाधिक लागवड, पहा किती झाली पेरणी?