नाशिक : जिल्ह्यात खरिपाची पेरणी (Kharif Sowing) अंतिम टप्प्यात असून ६ लाख ४० हजार ५५० सरासरी हेक्टर क्षेत्रापैकी ४ लाख ९१ हजार ६८० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली असून मका पेरणी क्षेत्रात वाढ होऊन दोन लाख ८८ हजार ५९० क्षेत्रावर मका लागवड (Maize Sowing) झाली असून त्या खालोखाल ६४ हजार २८५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे.
मात्र, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे क्षेत्र होते, त्या क्षेत्रामध्ये घट होऊन मालेगाव, नांदगाव, येवला तालुके वगळता अनेक तालुक्यांमध्ये कापूस लागवड (Kapus Lagvad) शून्य टक्क्यावर आहे. यावर्षी मे महिन्यात बिगर मोसमी पाऊस, तर जून महिन्यात मोसमी पावसाने दमदार हजेरी लावल्याने आता १८ जुलै अखेरीस पेरणी ७६ टक्के पूर्ण झाली.
जिल्ह्यात मका, मूग पेरणी क्षेत्रात वाढयावर्षी वरूणराजाने जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी सुरू केली. जिल्ह्यात मका, मूग पेरणी क्षेत्रात वाढ असून नाशिक जिल्ह्यात ४ लाख ९१ हजार क्षेत्रावर खरीप पेरणी झाल्याने जिल्ह्यात ७६ टक्के पेरणी झालेली आहे.
नाशिक जिल्ह्यात मका पीक पेरणी क्षेत्रात वाढ होऊन आतापर्यंत २ लाख ८८ हजार हेक्टरवर मका पिकाची पेरणी झालेली आहे. सोयाबीन पिकाची ६४ हजार २८५ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
७६ टक्के पेरणी पूर्णदिवसेंदिवस शेतकरी पिकांमध्ये बदल करत असून अनेक शेतकऱ्यांनी कापसाला जास्त अवधी लागत असल्यामुळे कापसाला फाटा देऊन मका, मूग, कांदा पिकांचे नियोजन केले आहे.
पावसाची उघडीपगेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिके पाण्यावर आली असून शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. मे महिन्यात झालेल्या बिगर मोसमी पावसाने आणि जून महिन्यात सुरू झालेला मोसमी पाऊस अनेक भागात जोरदार बरसला. अजूनही काही तालुक्यांतील काही भागात अति पावसामुळे पेरणी खोळंबलेली होती ती आता पूर्णत्वाकडे आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने जूनच्या सुरुवातीलाच हजेरी लावल्याने येवला तालुक्यात खरीप हंगामातील ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. पावसामुळे थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या, त्या पूर्ण झालेल्या आहेत.- शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी, येवला