Kharif Crops : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीपातील पिकांची वाढ थांबली असून उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. तुरीची पाने पिवळी पडली आहेत, सोयाबीनवर खोडमाशी-चक्रीभुंगा तर कापसावर तुडतुडे व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. (Kharif Crops)
बीड जिल्ह्यात १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. एकूण ४० महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून, आतापर्यंत २०४५ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आणि तूर या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Kharif Crops)
पाणी साचल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. सध्या पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. (Kharif Crops)
पावसाची स्थिती
जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात ३८३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सर्वाधिक पाऊस परळी तालुक्यात ४७८.९ मिमी तर सर्वात कमी आष्टी तालुक्यात १९७.३ मिमी झाला आहे.
१४ ते १८ ऑगस्टच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून पिकांची वाढ रोखली गेली आहे.
पिकांवरील परिणाम
तूर : ४९ हजार २५० हेक्टरवर पेरणी झालेली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु जास्त पावसामुळे पाने पिवळी पडली आहेत. आणखी पाऊस झाला तर उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
सोयाबीन : ३ लाख ७१ हजार ७७० हेक्टरवर लागवड. फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेले हे पीक सततच्या पावसामुळे पिवळे पडले आहे. मूळकुज व बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता. खोडमाशी व चक्रीभुंगा यांचा प्रादुर्भाव वाढला असून थायक्लोप्रिड फवारणीचा सल्ला देण्यात आला आहे.
कापूस : २ लाख ४९ हजार ९९७ हेक्टरवर पेरणी. पिकावर मर रोग व तुडतुडे, फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसतोय. त्यावर उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईडची आळवणी करण्याची सूचना देण्यात आली आहे.
मूग व उडीद : ही पिके शेंगा पक्वतेच्या अवस्थेत असून अतिवृष्टीमुळे पिवळेपणा दिसून येतोय.लवकर पेरलेल्या मुगाची काढणी पावसामुळे लांबणीवर पडली आहे. उडीद पिकावर मर आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे.
कृषी विभागाचा सल्ला
शेतकऱ्यांनी शेतातील साचलेले पाणी त्वरित निचरा करावा.
रोग-किड नियंत्रणासाठी जैविक व रासायनिक उपाययोजना कराव्यात.
चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे, निंबोळी अर्काची फवारणी यांचा वापर करावा.
बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि रोग-किडींच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंताग्रस्त आहेत. येणाऱ्या काळातील हवामानावर खरीप उत्पादन अवलंबून राहणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : पिकांचे व्यवस्थापन कसे कराल? वाचा कृषी सल्ला सविस्तर