गजानन मोहोड
अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांत सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. (Kharif Crop Damage)
शेतं तलाव होऊन उभी पिके पिवळी पडत आहेत, सडायला लागली आहेत. पिकांची वाढ खुंटल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. (Kharif Crop Damage)
ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी शासनाकडून तातडीच्या पंचनाम्याची वाट पाहत आहेत.
सततच्या पावसामुळे झालेले नुकसान
जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी ओलांडली आहे.
जुलैपासून झालेल्या मुसळधार पावसाने सोयाबीन, कापूस यांसारखी खरीप पिके उद्ध्वस्त झाली.
पाण्याचा निचरा न झाल्याने शेतं दलदलीसारखी झाली आहेत.
ढगाळ हवामानामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्याने पिके पिवळी पडून सडत आहेत.
मशागत न झाल्याने तणांचा प्रादुर्भाव वाढला, तर सोयाबीनचे काडसुद्धा कुजले आहेत.
पंचनाम्यात अडचणी
सध्या कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेद्वारे फक्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे होत आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या इतर शेतकऱ्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची भावना निर्माण झाली आहे.
शासनाच्या २२ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार 'सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती' मानला आहे.
त्यामुळे या आदेशानुसार सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते होत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
शेतकऱ्यांची मागणी
शासन शेतकऱ्यांशी दुजाभाव करीत आहे. सततच्या पावसामुळे आमची पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. पंचनामे करून मदत दिवाळीपूर्वी मिळावी. - पवन देशमुख, शेतकरी
दोन वर्षांपूर्वी मदत, यंदा ठेंगा?
दोन वर्षांपूर्वी सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पंचनामे करून वाढीव निकषाने मदत दिली होती. परंतु, यंदा महायुतीचेच सरकार असतानाही पंचनाम्यांबाबत विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिकांचा पूर्ण हंगाम धोक्यात गेला असून, शेतकरी पंचनामे आणि मदतीसाठी शासनाकडे टाहो फोडत आहेत. दिवाळीपूर्वी तरी योग्य तो निर्णय व्हावा, अशी सर्वत्र मागणी आहे.