Banana Variety : भाभा अणुसंशोधन केंद्राने देशातील पहिली उत्परिवर्तित केळीचे वाण ट्रॉम्बे बनाना म्युटंट-9 विकसित केले आहे. केंद्र सरकारने ' कावेरी वामन' हे अधिकृत नाव या वाणाला दिले आहे. भारताच्या कृषी क्षेत्रासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
या महत्त्वाच्या शोधानंतर, भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित करून, प्रत्यक्षात जारी केलेले हे पहिले फळ पीक ठरले असून, आता संस्थेकडील सुधारित पिकांच्या एकूण वाणांची संख्या ७२ झाली आहे. आयनकारी किरणोत्सर्गाचा वापर करून बागायती पिकांच्या सुधारणेत क्रांती घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले असल्याचे अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी म्हटले आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारीतील तिरुचिरापल्ली इथल्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या सहकार्याने 'कावेरी वामन' ही जात विकसित केली आहे. या वाणाचे उत्पादन ग्रांडे नैन या लोकप्रिय प्रकाराअंतर्गत घेतले गेले आहे. याअंतर्गत उपयुक्त उत्परिवर्तन घडवून आणण्यासाठी गॅमा किरणोत्सर्गाचा वापर करण्यात आला होता.
अनेक वर्षांच्या चाचणी आणि विस्तृत क्षेत्रीय चाचण्यांनंतर टीबीएम-९ हा घटक, उत्कृष्ट कृषी-वैज्ञानिक गुणतत्वांसाठी निवडला गेला होता. 'कावेरी वामन' या जातीमुळे जास्त प्रमाणात लागवड केल्या जाणाऱ्या ग्रांडे नैन केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये
'कावेरी वामन' हे वाण आखूड उंचीचे असून, यामुळे ते जमिनीवर लोळण घेत नाही हा याचा मोठा फायदा आहे. केळीचे झाड उंच असल्यास, विशेषत: वादळी किनारपट्टीच्या प्रदेशात असल्यास ते जमीनीवर लोळण घेणे ही एक सामान्य समस्या बनते. मात्र हे वाण आखूड उंचीचे असल्याने त्याला लाकडी किंवा बांबूच्या आधाराची गरज उरत नाही, परिणामी लागवडीचा खर्चही लक्षणीयरित्या कमी होतो.
हे नवीन वाण मूळ वाणापेक्षा १.५ महिने लवकर परिपक्व होते, ज्यामुळे कापणीचे चक्र जलदगतीने पूर्ण होते. इतक्या सुधारणा केल्यानंतरही, या वाणाच्या फळामध्ये ग्रांडे नैननची चव आणि गुणवत्ता विषयक वैशिष्ट्ये कायम आहेत. हे वाण जास्त घनतेच्या लागवडीसाठी आणि टेरेस गार्डनिंगसाठीही उपयुक्त आहे. यामुळे व्यावसायिक तसेच घरगुती अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी हे वाण जात आधार देणारे ठरणार आहे.
