Karvanda Fruit : सह्याद्रीच्या कुशीत, डोंगरउतारांवर आणि रानावनांत उन्हाळ्यात बहरणारा रानमेवा म्हणजे करवंद. गडद जांभळट-काळ्या रंगामुळे 'डोंगरची काळी मैना' म्हणून ओळखले जाणारे हे आंबट-गोड फळ आता हळूहळू दुर्मिळ होत चालले आहे. (Karvanda Fruit)
पूर्वी डोंगररांगांमध्ये सहज दिसणाऱ्या करवंदाच्या काटेरी जाळ्या आता वेगाने नष्ट होत असून, निसर्गाचा हा मौल्यवान ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.(Karvanda Fruit)
उन्हाळ्याच्या दिवसांत करवंद खाण्याचा आनंद हा ग्रामीण भागातील जीवनशैलीचा एक भाग मानला जात होता. डोंगरांवर भटकंती करताना करवंद तोडण्याची मजा, गावातील बाजारांत विक्रीसाठी येणाऱ्या करवंदाच्या टोपल्या आणि त्यापासून तयार होणारे लोणचे, सरबत, जेली यामुळे या रानमेव्याला विशेष महत्त्व होते. मात्र, बदलत्या परिस्थितीत हा ठेवा आता धोक्यात आला आहे.
वणव्यांचा सर्वाधिक फटका
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, दरवर्षी उन्हाळ्यात डोंगराळ भागांत लागणाऱ्या वणव्यांमुळे करवंदाच्या शेकडो जाळ्या जळून खाक होत आहेत. करवंदाची झुडपे काटेरी आणि दाट असल्याने आग लागल्यानंतर ती वेगाने नष्ट होतात. अनेक भागांत दरवर्षी पुनरावृत्ती होणाऱ्या वणव्यांमुळे करवंदाच्या नैसर्गिक वाढीवर गंभीर परिणाम होत आहे.
याशिवाय जंगलातील मानवी हस्तक्षेपही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डोंगरउतारांवर वाढते शहरीकरण, रस्त्यांचे रुंदीकरण, बांधकामे आणि वृक्षतोड यामुळे नैसर्गिक झुडपे हटवली जात आहेत. परिणामी करवंदाच्या जाळ्यांचे अस्तित्व कमी होत चालले आहे.
हवामान बदलाचाही परिणाम
पावसाचा लहरीपणा, वाढता उकाडा आणि बदलते हवामान यामुळे करवंदाच्या वनस्पतींच्या नैसर्गिक चक्रावरही विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. योग्य वेळी पाऊस न पडल्याने आणि तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने करवंदाच्या फुलोऱ्यावर आणि फळधारणेवर परिणाम होत आहे.
पूर्वी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारा हा रानमेवा आता अनेक भागांत अत्यल्प प्रमाणात दिसून येत आहे.
नवी पिढी रानमेव्यापासून दूर
करवंद गोळा करणे हे मेहनतीचे काम मानले जाते. काटेरी झुडपांतून काळजीपूर्वक फळे तोडावी लागतात. मात्र या फळांना बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेकांनी हा व्यवसाय सोडला आहे.
त्यातच ग्रामीण भागातील नवी पिढी मोबाइल, शिक्षण, शहरांकडे रोजगार किंवा इतर व्यवसायांकडे वळत असल्याने रानमेवा गोळा करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. परिणामी करवंदासारख्या पारंपरिक रानफळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
आरोग्यासाठी वरदान
करवंद हे केवळ चविष्ट फळ नसून आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. यामध्ये 'क' जीवनसत्त्व, लोह आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत होते.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी करवंदाचे सरबत गुणकारी मानले जाते. तसेच अपचन, थकवा आणि शरीरातील दाह कमी करण्यासाठीही करवंद उपयुक्त ठरते.
पर्यावरणासाठीही महत्त्वाचे
करवंदाची काटेरी झुडपे मातीची धूप थांबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. डोंगरउतारांवर ही झुडपे नैसर्गिक संरक्षक भिंतीप्रमाणे काम करतात. त्यामुळे पावसाळ्यात माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
पर्यावरणप्रेमींच्या मते, करवंदाच्या जाळ्या नष्ट होणे म्हणजे केवळ एका फळाचा लोप नव्हे, तर संपूर्ण जैवविविधतेसाठी धोक्याची घंटा आहे.
संवर्धनासाठी पुढाकाराची गरज
पर्यावरणप्रेमींनी करवंद संवर्धनासाठी शासन आणि वन विभागाने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.
संवर्धनासाठी सुचविलेले उपाय
सामाजिक वनीकरणांतर्गत करवंदाची लागवड वाढविणे
महिला बचत गटांना करवंद संकलन आणि विक्रीसाठी प्रोत्साहन
करवंदावर आधारित गृहउद्योगांना आर्थिक मदत
करवंदापासून ज्यूस, लोणचे, जेली, मुरंबा निर्मितीला चालना
डोंगराळ भागात वणवे रोखण्यासाठी उपाययोजना
पुढील पिढीला फक्त पुस्तकांतच दिसेल
जर आपण आताच रानमेव्याचे संवर्धन केले नाही, तर पुढील पिढीला 'डोंगरची काळी मैना' केवळ पुस्तकात आणि चित्रांमध्येच पाहावी लागेल. हा निसर्गाचा समतोल बिघडवणारा गंभीर इशारा आहे.- नितीन आळकुटे, अध्यक्ष, जीवदया फाऊंडेशन
पर्यावरण संवर्धनासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, करवंदासारख्या स्थानिक वनस्पती आणि रानमेव्यांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Seed Germination Test : चमकदार बियाण्यांना फसू नका; पेरणीपूर्वी 'ही' टेस्ट कराच
अधिक वाचा : Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू
Web Summary : Karvanda fruit, once abundant, is disappearing due to deforestation, wildfires, and climate change. This threatens rural livelihoods and biodiversity, demanding urgent conservation efforts. The fruit is important for health and soil conservation.
Web Summary : कभी प्रचुर मात्रा में मिलने वाला करवंदा फल, वनों की कटाई, जंगल की आग और जलवायु परिवर्तन के कारण गायब हो रहा है। इससे ग्रामीण आजीविका और जैव विविधता खतरे में है, जिसके लिए तत्काल संरक्षण प्रयासों की आवश्यकता है। यह फल स्वास्थ्य और मिट्टी के संरक्षण के लिए महत्वपूर्ण है।