जळगाव : वाढत्या उष्णतेमुळे उन्हाळी कपाशी लागवड अडचणीत आली आहे. तालुक्याचे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने जमिनीतील बियाणे जळण्याची भीती निर्माण झाली असून अनेक शेतकरी उन्हाळी कपाशी लागवडीपासून दूर राहत आहेत. पाण्याची टंचाई, उष्णतेची लाट आणि अनिश्चित हवामानामुळे मान्सूनपूर्व पेरणीवर संकट निर्माण झाले आहे.
एप्रिल महिन्यातच तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. अशा प्रखर उष्णतेत पेरलेले बियाणे जमिनीत टिकणे कठीण ठरत असून उगवण क्षमतेवर परिणाम होत आहे. काही भागात विहिरी व विंधन विहिरींची जलपातळी घटल्याने सिंचनाची समस्या अधिक तीव्र झाली आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीला खरीप हंगामासाठी कापूस लागवड केली जाते. यंदा मात्र अजून तापमानवाढीचा अंदाज वर्तविण्यात आल्याने यंदा कापूस लागवड लांबविणार पडण्याचे चित्र दिसत असून त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
बियाणे जळणे व कुजण्याचा धोका
वाढत्या उष्णतेमुळे बियाणे जळण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसाचा धोका असल्यास पेरलेले बियाणे कुजण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्याच्या परिस्थितीत हवामान अंदाज बघून सावधगिरी बाळगूनच लागवड करावी, अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते, असा इशाराही कृषी विभागाने दिला आहे.
सिंचनाच्या अभावामुळे लागवड घटली
जामनेर तालुक्यात सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी उन्हाळ्यात कपाशीची लागवड करतात. मात्र यंदा पाण्याअभावी अनेकांनी पेरणी टाळली आहे. ज्वारीसारख्या पर्यायी पिकांकडे काही शेतकरी वळत असले तरी उष्णतेचा परिणाम सर्व पिकांवर जाणवत आहे.
तापमानाची तीव्रता लक्षात घेता उन्हाळी कपाशीची लागवड मर्यादित प्रमाणात करावी. सिंचनाची शाश्वत सुविधा असलेल्या जमिनीवरच लागवड करावी. शक्य असल्यास सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाणी द्यावे, जेणेकरून मुळांना थंडावा मिळेल.
- जितेंद्र पाटील, कृषी अधिकारी, जामनेर
सावधान! तुमचंही नुकसान होऊ शकतं, कर्जमाफीबाबत RBI कडून महत्वाचे आवाहन, नेमका प्रकार काय आहे?