Kapus Kharedi : वैजापूर तालुक्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) दोन कापूस खरेदी केंद्रांत आतापर्यंत केवळ ३९ हजार ३७७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. उशिराने सुरू झालेली केंद्रे आणि आता खासगी बाजारात वाढलेल्या दरामुळे शासकीय केंद्रांत आवक कमी झाली आहे. शिवाय जिल्हा बंदी व कमी उत्पादनाचाही फटका यंदा बसला आहे. (Kapus Kharedi)
वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला परिसरात शुभम व गोदावरी जिनिंगमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. शासकीय दरात कापूस विक्रीसाठी 'कपास किसान' मोबाइल ॲपवर तालुक्यातील ४ हजार ६२९ शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी केली होती. (Kapus Kharedi)
त्यातील २ हजार ९९७ शेतकऱ्यांना द्विस्तरीय पडताळणीनंतर कापूस विक्रीची मंजूर दिली. तर ४७८ शेतकऱ्यांच्या कागदपत्रांत त्रुटी आढळून आल्या आहेत. (Kapus Kharedi)
दोन्ही केंद्रांवर आतापर्यंत २ हजार ७२४ शेतकऱ्यांचा ३९ हजार ३७७क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, अद्याप १ हजार १५४ शेतकऱ्यांची पडताळणी झालेली नाही. तर पात्रपैकी २७३ असे एकूण १ हजार ४२७शेतकऱ्यांचा कापूस खरेदीसाठी शिल्लक आहे. कापसाची प्रतवारी बघून ७ हजार ५०० ते ७ हजार ८०० रुपयांचा भाव देण्यात आला.
जिल्हा बंदीचाही परिणाम
यावर्षी कापूस विक्रीसाठी जिल्हा बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही शासकीय केंद्रांवर लगतच्या जिल्ह्यातून येणाऱ्या कापसाच्या आवकवर परिणाम झाला आहे.
तसेच शेवटच्या टप्प्यात कापूस कमी राहिल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा जास्त दरात खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आता शासकीय खरेदी केंद्राऐवजी व्यापाऱ्यांना कापूस देण्यास पसंती देत आहेत.
समितीला ३२ लाखांचे उत्पन्न
कापूस खरेदीच्या किमतीवर बाजार समितीला सेस कर्जापोटी १ टक्का रक्कम मिळते. तालुक्यात झालेल्या खरेदीच्या तुलनेत अंदाजे ३२ लाख रुपये समितीला प्राप्त होतील, अशी माहिती बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे यांनी दिली.
४ हजार ६२९ शेतकऱ्यांनी वैजापूर तालुक्यातील दोन केंद्रांवर कापूस विक्रीसाठी नोंद केली होती. त्यापैकी कागदपत्रांच्या पूर्ततेत पात्र ठरलेल्या २ हजार ९९७ शेतकऱ्यांच्या कापसाची आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Solar Scheme : वीज गेली? चिंता नको! सौर कृषिपंपांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला
