Kapus Kharedi : हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या नोंदणीची अंतिम मुदत जवळ आली असून अवघे सहा दिवस शिल्लक आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार हमी केंद्रावर कापूस विक्रीसाठी दि. १६ जानेवारीपर्यंत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Kapus Kharedi)
मात्र यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कापूस उत्पादक शेतकरी अद्याप नोंदणीच्या प्रतीक्षेत असल्याने आगामी काळात कापूस विक्रीसाठी त्यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Kapus Kharedi)
'कपास किसान' अॅपवर नोंदणी; तांत्रिक अडचणींचा पाऊस
कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना 'कपास किसान' अॅपच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे.
या नोंदणीनंतरच कापूस विक्रीसाठी परवानगी दिली जाते. परवानगी मिळाल्यानंतर शेतकरी हमी केंद्रावर कापूस घेऊन जातात. मात्र प्रत्यक्ष विक्रीच्या वेळी अनेकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ओटीपी म्हणजेच मोठा अडसर
कापूस विक्रीच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी (One Time Password) पाठवला जातो.
हा ओटीपी मिळाल्यानंतरच संपूर्ण माहिती अद्ययावत होते आणि कापूस विक्रीची पावती तयार होते. मात्र याच ओटीपी प्रक्रियेमुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
नोंदणी करताना अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक न देता मुलांचा, घरातील सदस्यांचा किंवा सीएससी केंद्रचालकांचा मोबाईल क्रमांक दिला आहे. परिणामी ओटीपी त्या क्रमांकावर जातो. याची माहिती अनेक शेतकऱ्यांना नसल्याने ओटीपी शोधण्यातच वेळ जात असून काही वेळा ओटीपीची वैधताच संपते.
नेटवर्क व तांत्रिक ज्ञानाचा अभाव
ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर किंवा घराजवळ मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ओटीपी वेळेत मिळत नाही.
काहींना मोबाइलवरील मेसेज बॉक्स कसा तपासायचा, ओटीपी कुठे दिसतो, याचीही पुरेशी माहिती नाही.
फोनवरून 'ओटीपी पाठवा' असे सांगितले तरी समोरच्या व्यक्तीलाही नेमके काय करायचे, हे न कळल्यामुळे शेतकरी चांगलेच हैराण झाले आहेत.
आधारवरील स्पेलिंग चुकांचा फटका
अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील नावाचे स्पेलिंग आणि नोंदणी करताना टाकलेले स्पेलिंग यामध्ये तफावत असल्याचेही आढळून येत आहे.
या त्रुटींमुळे ओटीपी मिळण्यात अडथळे येत असून काही शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे कापूस विक्रीची प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची बनली आहे.
मुदतवाढीची मागणी
अवघ्या काही दिवसांत नोंदणी पूर्ण न झाल्यास हमीभावाने कापूस विक्रीची संधी गमावावी लागेल, या भीतीने शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे.
तांत्रिक अडचणी लक्षात घेता नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, तसेच हमी केंद्रांवर प्रत्यक्ष मदत कक्ष सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी व संघटनांकडून होत आहे.
प्रशासनापुढेही आव्हान
एकीकडे कापसाची आवक वाढत असताना, दुसरीकडे नोंदणी आणि ओटीपी प्रक्रियेतील अडचणींमुळे विक्री प्रक्रिया खोळंबण्याचा धोका निर्माण झाला आहे.
उर्वरित काही दिवसांत प्रशासनाकडून तातडीची उपाययोजना न झाल्यास कापूस खरेदी व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
