बापू सोळुंके
मराठवाड्यात यंदाच्या अतिवृष्टीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आधीच मोठे नुकसान झाले असताना आता केंद्र सरकारच्या भारत कापूस निगमने (सीसीआय) आणखी एक धक्का दिला आहे. (Kapus Kharedi)
'सीसीआय'ने प्रत्येक जिल्ह्यासाठी कापूस खरेदीची मर्यादा निश्चित केली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रतिएकर केवळ साडेचार क्विंटल कापूसच हमीभावाने स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उर्वरित कापूस व्यापाऱ्यांकडे कमी दरात विकण्याची वेळ आली आहे.(Kapus Kharedi)
अतिवृष्टीमुळे उत्पादन घट
मराठवाड्यात यंदा खरीप हंगामात सलग पावसामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. अनेक शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली, पिके पिवळी पडली आणि उत्पादकता कमी झाली.
अशा परिस्थितीत शेतकरी हमीभावाने मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा करत होते. मात्र, सीसीआयने मर्यादा जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
हमीभाव किती?
मध्यम धाग्याचा कापूस : ७,७१० प्रती क्विंटल
लांब धाग्याचा कापूस : ८,११० प्रती क्विंटल
....पण सर्व जिल्ह्यांना समान लाभ नाही
'सीसीआय'ने मराठवाड्यात ५९ केंद्रे सुरू केली असल्याची माहिती दिली आहे. मात्र, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र कमी असल्याचे कारण देत तेथे एकही केंद्र सुरू करण्यात आलेले नाही.
कापुस खरेदी केंद्रे कुठे?
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी उत्पादन साडेचार क्विंटल असल्याच्या कारणावरून तेवढ्याच मर्यादेत खरेदी केली जात असल्याचे 'सीसीआय'चे स्पष्ट मत आहे.
जिल्हानिहाय मर्यादेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी
सीसीआयने जिल्हानिहाय एकरी खरेदी मर्यादा निश्चित केली आहे. छत्रपती संभाजीनगरात ही मर्यादा ४.५ क्विंटल/एकर इतकीच ठेवण्यात आली आहे.
उर्वरित कापूस व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत असल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
अतिवृष्टीमुळे उत्पादन कमी झाले, तेवढ्यातही सरकार मर्यादा ठेवते. अधिक उत्पादन झाले तर त्याचा दोष शेतकऱ्यांचा कसा?
ही मर्यादा चुकीची आणि शेतकऱ्यांविरोधातील सुलतानी आहे. सरकारने ती तत्काळ हटवावी आणि एकरी १२ क्विंटलपर्यंतचा कापूस हमीभावाने घ्यावा.- अंबादास दानवे, (उद्धवसेना नेता आणि माजी विरोधी पक्षनेते)
जिल्ह्याचे सरासरी उत्पादन ४.५ क्विंटल
कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सरासरी उत्पादन साडेचार क्विंटल आहे. त्यामुळे त्याच प्रमाणातच प्रतिशेतकरी खरेदी केली जात आहे. - विनोदकुमार, महाव्यवस्थापक, सीसीआय
उर्वरित कापसाचे काय?
सीसीआय मर्यादा ओलांडल्यानंतरचा कापूस शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे विकावा लागतो.
या व्यापाऱ्यांकडून मिळणारे दर हमीभावापेक्षा ७०० ते १,००० रुपये कमी असल्याने मोठे आर्थिक नुकसान होते.
शेतकऱ्यांची मागणी
* एकरी खरेदी मर्यादा रद्द करावी
* हमीभावात सर्व उत्पादकांचा संपूर्ण कापूस घ्यावा
* अतिवृष्टीग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे
हे ही वाचा सविस्तर :Kapus Kharedi : कापूस खरेदीसाठी अर्जांची छाननी; ५ हजार शेतकरी 'त्रुटी'त अडकले
